सिंधुदुर्ग जिंकलय आता ‘लक्ष्य महाराष्ट्र’, नारायण राणेंनी सांगितली रणनिती

431

सिंधुदुर्ग/मुंबई – राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या आणि राणे विरुद्ध शिवसेना व महाविकास आघाडी अशा झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत राणेंनी वचर्स्व मिळवले आहे. वादविवाद, मारहाण प्रकरण आणि कोर्टकचेरी यामुळे गाजलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या नेतृत्वाखालील भाजपाने शिवसेनेला धोबीपछाड दिला आहे. त्यानंतर, नारायण राणेंनी सिंधुदुर्ग जिंकला आता, लक्ष्य महाराष्ट्र असल्याचं म्हटलं आहे. नारायण राणेंनी राज्यातही भाजपचीच सत्ता येणार असल्याचे भाकित केलंय. 

सिंधुदुर्ग जिंकलं आता लक्ष्य महाराष्ट्र आहे. सिंधुदुर्ग जतना बँकेवर माझा नाही, भाजपचा विजय आहे. महाराष्ट्रात आमची सत्ता नाही, थोडक्यात हुकली आहे. महाराष्ट्राला मुख्यमंत्री आणि चांगल्या सरकारची गरज आहे. सध्या राज्य अधोगतीकडे चालले आहे. या राज्यातील जनतेला सुख-समाधान आणि समृद्धी यावी, यासाठी केंद्राप्रमाणेच राज्यातही भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री हवा आहे, असे म्हणत राज्यात भाजपचे सरकार येणार असल्याचं भाकीत नारायण राणे यांनी केलंय. 

दरम्यान, 36 मतं मिळू शकत नाही, पण बाता विधानसभेच्या करतो, असे म्हणत राणेंनी स्थानिक विरोधकांवर टीका केली. राजन तेली यांनी राजीनामा दिल्यासंदर्भात नारायण राणेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्याव, आता केंद्रापर्यंत आमची सत्ता आहे, राजन यांना कुठेतरी घेऊच. राजन यांच्यासंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील, असेही नारायण राणेंनी म्हटले. 

जिल्हा बँकेच्या १९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या आतापर्यंत समोर आलेल्या या निकालांमध्ये भाजपा पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनेलला ११ जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या खात्यात ८ जागा गेल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक झाल्यानंतर सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण तापले होते. त्यातच सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे जिल्ह्यातील परिस्थिती अधिकच संवेदनशील झाली होती. 

शिवसेना आणि महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज उमेदवार पराभूत झाले. त्यामध्ये शिवसेना नेते आणि विद्यमान जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष सतीश सावंत यांना पराभवाचा धक्का बसला आहे. मतमोजणीमध्ये समसमान मतं पडल्यानंतर ईश्वर चिठ्ठीद्वारे करण्यात आलेल्या निवडीमध्ये भाजपा पुरस्कृत पॅनेलचे उमेदवार विठ्ठल देसाई यांनी सतीश सावंत यांचा पराभव केला आहे. दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाली. अखेर या लढतीचा निकाल ईश्वरचिठ्ठीद्वारे लागला. त्यामध्ये विठ्ठल देसाई यांनी बाजी मारली.

संतोष परब हल्ला प्रकरणात भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावरही आरोप झाले. तसेच त्यांचा जामीन अर्जही कोर्टाने फेटाळला आहे, अशा वातावरणात झालेल्या या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनेलने बाजी मारली. या पॅनेलमधून, विठ्ठल देसाई, महेश सारंग, मनीष दळवी, दिलीप रावराणे, अतुल काळसेकर, बाबा परब, प्रकाश बोडस हे उमेदवार विजयी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here