
अहिल्यानगर – सावकारांच्या जाचास कंटाळून एकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सारसनगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर रंगनाथ खंडके (वय ४२, रा. त्रिमूर्ती चौक, सारसनगर) असे मयताचे नाव आहे.
याबाबत मयताची पत्नी पुष्पा मयूर खंडके यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, मयत मयूर खंडके यांनी प्रवीण अनिल सुंबे (रा. महात्मा फुले चौक) व पंकज राजू भोसले (रा. भोसले आखाडा) यांच्या कडून व्याजाने पैसे घेतले होते. ते सुमारे १ कोटी रुपये या दोघांना परत करूनही ते मयूर खंडके यांना अधिक व्याजाच्या पैशांसाठी तगादा लावत होते. पैशांसाठी या दोघांनी त्यांना प्रचंड त्रास दिला.
या त्रासाला कंटाळून मयूर यांनी २९ ऑक्टोबर रोजी रात्री ९.१६ च्या सुमारास राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. ही बाब त्यांच्या कुटुंबियांच्या निदर्शनास येताच त्यांना उपचारासाठी नगरमधील खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना १ नोव्हेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आत्महत्येस प्रवीण सुंबे व पंकज भोसले हे दोघे कारणीभूत असल्याचा आरोप करत पुष्पा खंडके यांनी २ नोव्हेंबर रोजी रात्री कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी दोघांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी बीएनएस कलम १०८, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
मयत मयूर खंडके यांच्यावर २ नोव्हेंबर रोजी नालेगाव अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, १ मुलगा, ३ मुली असा परिवार आहे.




