साडेचार महिन्यांच्या अखंड व अविरत सेवेनंतर
जिल्हा क्रीडा संकुल मिरज येथील डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटरला विश्रांती
-जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
- 2 हजार 45 रुग्णांवर उपचार, 1 हजार 786 रुग्ण बरे
- 126 डॉक्टर्स, कर्मचारी यांचे अखंड योगदान
सांगली, दि. 31, (जि. मा. का.) : जिल्हा क्रीडा संकुल मिरज येथे उभारण्यात आलेले 156 खाटांचे डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर दिनांक 15 एप्रिल 2021 पासून 31 ऑगस्ट अखेर अखंड, अविरतपणे कोव्हिड रुग्णांच्या सेवेत कार्यरत होते. या सेंटरमध्ये आज अखेर दाखल झालेल्या 2 हजार 45 रुग्णांवर उपचार करण्यात येऊन यातील 1 हजार 786 रुग्ण या ठिकाणी पुर्णपणे बरे होऊन त्यांना डिसचार्ज देण्यात आला. तर 139 रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भीत करण्यात आले. या साडेचार महिन्यांच्या कालावधीत 108 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यु झाला. या ठिकाणी सेवा देणारे डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ या सर्वांच्या योगदानाबद्दल आपल्याला अभिमान असल्याचे सांगत सदरचे कोव्हिड सेंटर आजपासून पुढील आदेश होई पर्यंत बंद करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी येत्या काळात कोरोनाचे रुग्ण वाढल्यास पुन्हा हे सेंटर सुरु करण्यात येईल, असेही स्पष्ट केले.
15 एप्रिल 2021 ला जिल्हा क्रीडा संकुल मिरज येथे सुरु करण्यात आलेल्या 156 खाटांच्या डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये 7 व्हेन्टीलेटर, 2 बायपॅप मॉनिटर, 5 हायफलो, 5 मॉनिटर तसेच सर्व 156 ऑक्सिजन बेड उपलब्ध होते. सदरचे सेंटर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व डीसीएचसी क्रीडा संकुल मिरजचे अध्यक्ष चंद्रकांत गुड्डेवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या देखरेखी खाली सुरु होते. याठिकाणी 3 वैद्यकीय अधिक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी, 4 कन्सलटन्ट, 6 एबीबीएस वैद्यकीय अधिकारी, 16 आरबीएसके वैद्यकीय अधिकारी, 23 समुदाय आरोग्य अधिकारी, 3 आयुष वैद्यकीय अधिकारी, 2 दंतशल्य चिकित्सक, 46 नर्सिंग स्टाफ, 3 समुपदेशक, मानसोपचार तज्ञ, 11 औषध निर्माता, ईसीजी तंत्रज्ञ, डाटा एन्ट्री ऑपरेटर आदी स्टाफ अविरतपणे कार्यकर होता.
या सेंटरमध्ये रुग्णांसाठी सर्व औषधोपचार, भोजन व्यवस्था, सर्व प्रकारच्या तपासण्या, एक्सरे पुर्णपणे मोफत देण्यात येत होत्या. या ठिकाणी जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांमधून संदर्भीत करण्यात आलेले रुग्ण तसेच महानगरपालिका क्षेत्रातील, ग्रामीण भागातील, इतर जिल्हृयातील व इतर राज्यातील सुध्दा अत्यवस्थ व गंभीर रुग्णांवर यशस्वीपणे व पुर्णपणे मोफत उपचार करण्यात आले.
अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी आपला रुग्ण कोरोनातून बरा झाला. या काळात जिल्हा क्रीडा संकुल मिरज येथील डेडिकेटेट कोव्हिड हेल्थ सेंटरमधील डॉक्टर्स, नर्सेस, अन्य स्टाफ यांनी त्यांची घेतलेली काळजी, केले उपचार, केलेली सुश्रुषा, मिळालेले चांगल्याप्रतीचे जेवण याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत मिठाई वाटून अनंद साजरा केला. पुष्पुगुच्छ, पुष्पहार देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अनेकांनी या कोव्हिड सेंटरमध्ये ज्या प्रकारे आपली काळजी घेतली गेली त्यामुळे आम्हाला आम्ही आमच्या घरच्या माणसांमध्येच आहोत अशी भावना निर्माण झाल्याचे सांगितले.
या ठिकाणी उपचार घेतलेल्या सांगली येथील कोरोना बाधीत महिला रुग्ण आपला अनुभव सांगताना म्हणाल्या, मला कोरोना झाल्यानंतर मी भितीने रडत होते. मी पुन्हा घरी परतु शकणार नाही असेच मला वाटत होते. पण मी जेव्हा जिल्हा क्रीडा संकुल मिरज मधील कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये दाखल झाले तेव्हा येथील डॉक्टर्स, नर्सेस यांनी माझी काळजी घेऊन मला धीर दिला, वेळेवर उपचार केले, रात्रदिवस त्यांनी माझी काळजी घेतली. येथील स्वच्छता, जेवन हे ही उत्तम प्रतीचे होते. या सर्वांनी दिलेल्या सेवेमुळेच मी लवकर बरी होऊ शकले. मी पुन्हा माझ्या घरी परतत आहे. याचा मला मनापासुन आनंद आहे.
अशाच पध्दतीची भावना कुर्डुवाडी, ता-माढा, जिल्हा – सोलापूरच्या रुग्णानेही व्यक्त केली. या रुग्णाची मुलगी व बहिण सांगली येथे असल्याने तसेच सोलापूर येथे अनुषांगिक औषध उपलब्ध होत नसल्याने ते उपचारासाठी क्रीडा संकुल येथील कोव्हिड सेंटरमध्ये दाखल झाले. या ठिकाणी उपचार करणारी माणसे, सुविधा, स्वच्छता, जेवन अतिशय चांगले असल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे व सर्व टीमचे आभार मानले.
0000000






