सहकारमंत्र्यांच्या दालनात ‘कोरोना किलर’
सहकारी आस्थापनांमध्ये यंत्रणा बसविण्याबाबत लवकरच निर्णय
जागतिक पातळीवर विशेष महत्व प्राप्त झालेल्या आयोनायझेशन या शास्त्रशुद्ध पद्धतीवर संशोधित ‘कोरोना किलर’ हे मशिन देशभर मान्यताप्राप्त होत असताना आता महाराष्ट्राचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या दालनातही हे मशिन बसविण्यात आले आहे.
या मशिनचे संशोधन केलेल्या इंडोटेक इंडस्ट्रीयल सोल्युशन्स् या कंपनीचे संस्थापक, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर भाऊसाहेब जंजिरे व सहकाऱ्यांनी बाळासाहेब पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात कोरोना किलर या मशिनचे सादरीकरण केले.
कोरोना व्हायरसला ही मशिन कशा पद्धतीने निष्प्रभ करते याविषयीची शास्त्रशुद्ध माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यानंतर हे मशिन बसविण्यात आले.
‘सहकारी संस्था आणि आस्थापनांमध्ये हे उपकरण बसविण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल’, असे सहकार मंत्र्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी लिमका पारितोषिक विजेते विकास पाटील – शिरगांवकर, अश्विन शहा, विनायक पटवर्धन हे उपस्थित होते.
महाराष्ट्रातील अनेक संस्था, साखर आयुक्तालय, शासकीय कार्यालये, देवस्थाने आणि निवासाच्या ठिकाणीही हे मशिन यापूर्वीच या संस्थेने बसविले आहे.