सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था
सुरु करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कोल्हापूर दि. 2 (जिल्हा माहिती कार्यालय): औद्योगिक प्रशिक्षणामध्ये 70 टक्के प्रात्यक्षिक व ३० टक्के सैध्दांतिक भाग समाविष्ट असतो. कोविड-19 प्रादुर्भावामुळे प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण सत्र ऑगस्ट 2020 ऐवजी नोव्हेंबरमध्ये सुरु झाले आहे. नोव्हेंबर 2020 ते मार्च 2021 पर्यंत केवळ चारच महिने प्रशिक्षण झाले आहे. त्यामुळे प्रशिक्षणाचा बहुतांश भाग अपूर्ण राहिलेला आहे. प्रशिक्षणार्थ्यांनी हे प्रात्यक्षिक संस्थेतील कार्यशाळेमध्ये उपस्थित राहून यंत्रसामुग्रीवर करणे अनिवार्य असते. ऑनलाईन पध्दतीमध्ये प्रात्यक्षिक घेणे शक्य नाही. तसेच सदर मुलांची अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा सप्टेंबर 2021 मध्ये होणार असल्याने उरलेल्या अत्यल्प कालावधीमध्ये प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुरु करुन पुर्ण करणे आवश्यक आहे. त्यानुसार दिनांक 25 ऑगस्टपासून सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
खालील अटी व शर्तीस अनुसरुन परवानगी देण्यात येत आहे-
१) मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण संस्था सुरु करण्याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्यात यावे.
२) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रवेश द्वारावर उपस्थित प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अनिवार्यतेने थर्मल स्क्रिनिंग करण्यात यावे. तसेच प्रत्येक वर्गखोली हवेशीर व 50 टक्के पेक्षा कमी आसन क्षमतेने वापरावी.
३) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उपस्थित प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तीन पदरी मास्क किंवा साधा कापडी मास्क किंवा रुमाल अथवा कापडाने नाक व तोंड झाकून वावरणे बंधनकारक राहील.
४) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कुटूंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार योग्य ते शारिरीक अंतर राखण्याबाबतचा नियम काटेकोरपणे पाळण्यात यावा.
५) ताप, सर्दी, खोकला इ. कोरोना सदृश्य लक्षणे असणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना संस्थेमध्ये प्रवेश देण्यात येवू नये.
६) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण 2020/प्र.क्र.140/एसडी-6, दिनांक 10/11/2020 रोजीच्या परिपत्रकातील मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील.
७) एकमेकांच्या वस्तू उदा. पेन, मोबाईल व इतर शैक्षणिक साहित्य इ. एकमेकांनी हाताळू नयेत.
८) औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्रवेशद्वार, बैठक कक्ष, बाथरुम, प्रसाधनगृह येथे हात धुण्याकरिता पुरेशा प्रमाणात साबण व सॅनिटायझर्स उपलब्ध करुन देण्यात यावेत. तसेच प्रशिक्षणाचे ठिकाण दररोज निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
९) सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी आवश्यक तेथे सर्व सैध्दांतिक प्रशिक्षण हे ऑनलाईन प्रशिक्षण माध्यमाद्वारे आयोजित करावे व प्रात्यक्षिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आयोजित करावे. यासाठी प्रशिक्षणार्थ्यांचे गट निर्माण करावे.
१०) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील सर्व खोल्यांचे 1 टक्का सोडीयम हायपोक्लोराईड वापरुन दररोज निर्जंतुकीकरण करणेत यावे. तसेच प्रत्येक तासिकेनंतर वर्ग खोली व आसन व्यवस्था निर्जंतुक करण्यात यावी.
११) सर्व 18 वर्षांवरील पात्र प्रशिक्षणार्थ्यांचे जिल्हा लसीकरण अधिकारी तसेच स्थानिक प्रशासनाशी संपर्क करुन आठ दिवसाच्या आत प्राधान्याने लसीकरण करुन घ्यावे.
१२) औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सर्व अधिकारी, कर्मचारी व निदेशकांचे प्रथम प्राधान्याने लसीकरण करुन घेणे तसेच कोविड-19 चाचणी करणे बंधनकारक आहे.
१३) सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा उल्लंघन केल्यास संबंधितांविरुध्द भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.

                                                     00000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here