सर्वांच्या सहकार्याने वार्ड कोरोनामुक्त करा – विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे यांची सूचना

482

पुणे, दि. २३:- कोरोनामुक्त गाव या उपक्रमाप्रमाणे सर्वांच्या सहकार्याने ‘कोरोनामुक्त वार्ड’ करण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे यांनी आज दिल्या.


विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गो-हे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, गटनेते राहुल कलाटे, आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


विधान परिषदेच्या उपसभापती श्रीमती गो-हे म्हणाल्या, १ ते ९ सप्टेंबर या कालावधीत बांधकाम, घरेलू तसेच वेगवेगळ्या कामात कार्यरत कामगारांची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवा. कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी प्रयत्न करा. संजय गांधी निराधार योजनांबाबत प्रलंबित विषय गतीने सोडविण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले. राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या विषयांचा पाठपुरावा करुन त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना देण्यासाठी प्रयत्न करा. कोविडमुळे निराधार महिलांच्या पुनर्वसनासाठी एक उपसमिती स्थापन करा, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गो-हे यांनी दिल्या.
आयुक्त राजेश पाटील यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील विविध कामकाजाचे सादरीकरणा द्वारे माहिती दिली.
यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here