- “आपल्याकडे गुरू परंपरा आहे. श्री समर्थ रामदास स्वामी यांची शिकवण जगाला मार्गदर्शक ठरणारी आहे. समर्थ रामदासांशिवाय शिवाजीला कोण विचारणार? यात मी शिवाजीला लहान करतो असे नाही,” असा छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज रविवारी संभाजीनगरातील एका कार्यक्रमात बोलताना केला. या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत
- मराठी राजभाषा दिनानिमित्त श्री समर्थ साहित्य परिषद तापडिया नाटय़मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचा समारोप राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रविवारी पार पडला. संत वाल्मिकी, कालिदास यांचा विचार, साहित्य जगात पोहचले आहेत. त्याप्रमाणे श्री समर्थ हेही ग्लोबल होण्याची गरज आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
- राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले, “देश गुलाम झाला होता, अन्याय-अत्याचार वाढत होते. त्याविरोधात लढण्याचा संकल्प छत्रपती शिवाजी यांनी केला. त्यांना समर्थ रामदासांसारखे गुरू मिळाले, ते सद्गुरू होते. त्यामुळे समर्थ रामदासांशिवाय शिवाजीला कोण विचारणार?’ असा छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख त्यांनी केला.
- राज्यपालांवर टीका
- राज्यपालांनी शिवाजी महाराजांचा अभ्यास करावा. तसेच समर्थ रामदास कधीच महाराजांचे गुरू नव्हते. मात्र तरीही असे सांगून राज्यपालांनी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळ माफी मागावी, अशी मागणी शिवचरित्र अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे.