सण उत्सवानिमित्त सामाजिक कार्यातून सकारात्मक उपक्रम राबवावे

501

सण उत्सवानिमित्त सामाजिक कार्यातून सकारात्मक उपक्रम राबवावे

जिल्हाधिकारी यांचे जिल्हा शांतता समिती सभेत आवाहन

 गर्दी टाळण्यासाठी सजावट, मोठे मंडप, देखावे टाळावेत

 मंडळांमार्फत रक्तदान शिबीर, कोविड लसिकरण कॅम्पचे आयोजन करावे

वर्धा, दि. 4 सप्टेंबर (जिमाका) : जिल्ह्यात शांतता कायम राखण्यासाठी पोळा, गणेशोत्सव, दुर्गोत्सव व इतर येणारे सर्व सण गर्दी न करता शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार साधेपणाने साजरे करण्यात यावे. या सणानिमित्त गणेशोत्सव व दुर्गोत्सव मंडळांमार्फत रक्तदान शिबीर, कोविड लसिकरण, शेतकऱ्यांमध्ये ई- पीक पाहणी अँप बाबत जनजागृती, नागरिकांमध्ये कोविड त्रिसुत्रीचे पालनाबाबत जनजागृती आदि सामाजिक उपक्रमांचे आयोजनातून सकात्मक ऊर्जा निर्माण करावी. आपल्या वर्तनामुळे जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण मिळणार नाही आणि त्यामुळे लॉकडाऊनची पाळी येऊन आपले उद्योग , व्यवसाय बंद ठेवावे लागणार नाहीत याची काळजी घेऊन लोकांनी सण- उत्सव साजरे करावे , असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आज केले.

जिल्हास्तरीय शांतता समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता साखरे, पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे ,संजय गायकवाड, गिरीश काशीकर, सुभाष तेलरांधे, श्यामसुंदर चांडक, तसेच इतर सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाल्या की, कोविड अजून संपलेला नाही, केरळमध्ये ओणम सणानंतर लगेच कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे आपल्याकडेही आता सणांना सुरुवात होईल. केरळ सारखी परिस्थिती आपल्याकडे होऊन संपूर्ण लॉक डाऊन करण्याची पाळी येऊ नये यासाठी नागरिकांनी गर्दी न करता उत्सव साजरे करण्याचे आवाहन त्यांनी केले. कोविड त्रिसुत्रीचे काटेकोर पालन केल्यास तीसरी लाट पुढे ढकलता येईल व लसिकरणाच्या माध्यमातून त्याची तिव्रता कमी करता येईल. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी सण उत्सव साधेपणाने साजरे करावे असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे यांनी ‘एक गाव एक गणपती’ हा संकल्प करून यासाठी सर्वच गावांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. शासनाने आपल्याला उत्सव घरच्याघरी साजरे करण्यासाठी कोणतेही बंधन घातलेले नाही, मात्र सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी. पोलीस विभागाने स्थापना मिरवणूक आणि विसर्जन मिरवणूक या दोन दिवशी जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर यांनी वर्धा हा शांतताप्रिय जिल्हा असून जिल्ह्याची ओळख अशीच कायम राहण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. गणेशोत्सव, दुर्गोत्सव या सणांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबिर, यासारखे उपक्रम राबवावे सोशल मीडियावर काही विक्षिप्त लोक महामानव आणि देवांच्या आक्षेपार्ह पोस्ट टाकून जन भावना दुखावण्याचे काम करीत असतात. मात्र अशा सर्व गुन्हेगारांवर पोलिसांचे करडी नजर असून अशा गुन्हेगारांना शोधून उचित कारवाई करण्याचे काम पोलीस करत असतातच. गणेश व दुर्गा मंडळाने शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्यासोबतच कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले
शासनाच्या सूचनेनुसार सार्वजनिक गणेशमुर्तीची उंची 4 फुट व घरगुती गणेशमुर्ती 2 फुट मर्यादेत असून मिरवणुकीस बंदी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी समिती सदस्यांनी मंडळांकडून भरून घेण्यात येणारा अर्ज हा सोपा करावा, मंडपाजवळ गणेश मंडळाची एक व्यक्ती कायम स्वरूपी उपस्थित राहील याची बंधन ठेवावे, दुर्गोत्सव मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे यामध्ये व्यापारी संघटनांना सोबत घ्यावे अशा सूचना केल्या केल्यात.डी जे ला बंदी करावी, लाऊड स्पीकरला रात्री 10 वाजतानंतर बंदी करावी आणि 90 डेसीबील पेक्षा आवाज जास्त राहणार नाही, दारू पिऊन मंडळामध्ये येणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी केली, तसेच अनेक वर्षात पहिल्यांदाच शांतता समितीची सभा आयोजित केल्याबाबत प्रशासनाचे आभार मानले.
बैठकीला प्रल्हाद गिरीपुंजे, दशरथ पांडे, सुभाष तेलरांधे, अक्सर इस्माईल शेख, विजय खैरे, रमेश भोयर, रामकृष्ण खुजे, करीमुद्दीन काझी, आदी सदस्य उपस्थित होते.
000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here