
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहिला आठवडा गोंधळात सरल्यानंतर आता आजपासून पुन्हा कामकाज सुरू होत असून, पहलगाम हल्ला व ऑपरेशन सिंदूर हे मुद्दे पुन्हा तापण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय सुरक्षा व परराष्ट्र धोरणावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने असतील. संसदेत यावर 16 तास चर्चा होईल.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह चर्चेला सुरुवात करतील. गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर देखील विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे देतील. पंतप्रधान मोदी देखील चर्चेत सहभागी होऊ शकतात. विरोधी पक्षाच्या वतीने विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सपा प्रमुख अखिलेश यादव आणि इतर खासदार सरकारला प्रश्न विचारतील.
लोकसभा आणि राज्यसभा, दोन्ही सभागृहात या चर्चेसाठी प्रत्येकी 16-16 तासांचा अवधी देण्यात आला आहे. ऑपरेशन सिंदूरवरील एकूण 16 तासांच्या चर्चेत काँग्रेसला सुमारे 3 तासांचा वेळ देण्यात आला आहे. या काळात खूप गोंधळ होण्याची देखील शक्यता आहे. काँग्रेसने त्यांच्या सर्व लोकसभा खासदारांना पुढील तीन दिवस सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला आहे.