संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सतर्क राहण्याच्या उपायुक्तांच्या सूचना

801

औरंगाबाद, दि.11 (जिमाका) – कोवीड संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत जिल्ह्याला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणांसोबत सर्व संबंधित विभागांनी सतर्क राहण्याच्या सूचना महसूल उपायुक्त पराग सोमण यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोवीड 19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक उपाय योजना, उपचार सुविधांबाबतच्या आढावा बैठकीत उपायुक्त सोमण यांनी संबंधितांना सूचना दिल्या. यावेळी उपायुक्त जगदीश मिनियार, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, सहायक आयुक्त शिवाजी शिंदे, वीणा सुपेकर, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात तिसऱ्या लाटेचा धोका उद्भवणार नाही याची खबरदारी घेत चाचण्यांचे प्रमाण गतीने वाढवणे गरजेचे आहे, असे सूचित करून सोमण यांनी शहरी भागात नियमित पाच हजार तसेच ग्रामीण भागात तालूका लोकसंख्येनुसार भरीव प्रमाणात चाचण्यांचे उद्दिष्ट ठरवून प्रमाण वाढवण्याची गरज आहे. त्यादृष्टीने गर्दीची ठिकाणे, सुपर स्प्रेडर, रेल्वे बसस्थानक, विमानतळ, बाहेरगावातून येणाऱ्या व्यक्ती या सर्वांच्या चाचण्या कराव्यात. जेणेकरून सुप्त बाधीत रूग्ण वेळीच लक्षात येतील आणि त्यांच्याव्दारा वाढत जाणारा संसर्ग रोखणे शक्य होईल. त्याच प्रमाणे जिल्ह्यात पर्याप्त प्रमाणात खाटा, आयसीयु, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन, कॉन्स्ट्रेसर, आवश्यक सुविधांसह प्रशिक्षित मनुष्यबळ तयार ठेवण्याच्या सूचना श्री. सोमन यांनी दिल्या.
उपायुक्त मिनियार यांनी घाटीमध्ये बालरोग तज्ज्ञ, बाल कोवीड उपचाराबाबतच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केल्या जात असून त्याठिकाणी अधिकाधिक संख्येने डॉक्टर्स, नर्सेस इतर संबंधितांना प्रशिक्षण द्यावे. पूरेशा प्रमाणात उपचार यंत्रणा सज्ज ठेवत असताना खासगी रूग्णालयांनाही कोवीड लक्षणे असलेल्या ताप, सर्दीच्या रूग्णांच्या आरटीपीसीआर करण्याबाबत मनपाने सूचीत करावे. सर्व शासकीय रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन उपलब्धता मुबलक ठेवण्यास प्राधान्य द्यावे. तसेच खासगी रुग्णालयांनाही त्यांच्या स्तरावर ऑक्सीजन उपलब्धतेची खबरदारी घेण्याबाबत सूचना देण्याचे मणीयार यांनी संबंधिताना सूचीत केले.
अपर जिल्हाधिकारी गव्हाणे यांनी जिल्ह्याचा रूग्ण बरे होण्याचा दर 97.50 टक्के असून लसीकरण, चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे निर्देश यंत्रणांना दिलेले आहे. त्याचप्रमाणे प्राधान्याने प्रशिक्षित मनुष्यबळ, ऑक्सीजन प्रकल्प कार्यान्वीत करण्याच्या अनुषंगाने पाठपुरावा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने खाटा, आयसीयु, मनुष्यबळ, चाचण्या, उपचार सुविधांच्या नियोजनाबाबत यावेळी गव्हाणे यांनी माहिती दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here