
संगमनेर: संगमनेर पालिकेसाठी मतदान झाल्यानंतर मतदान यंत्रे ठेवण्यात आलेल्या ‘स्ट्रांग रूम’वरील सीसीटीव्ही कॅमेरे आज, रविवारी अचानकपणे काहीवेळासाठी बंद पडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणाबद्दल संगमनेरकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ही माहिती मिळताच उमेदवार आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मतदान यंत्रांच्या सुरक्षेबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंका या घटनेमुळे आणखी गडद झाल्या आहेत.
निवडणूक प्रशासनाकडून अधिकृत खुलासा करण्यात आला नसला तरी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा पलिका मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी समाज माध्यमावर ‘हार्ड डिस्कची मेमरी’ भरल्याने ती बदलण्यासाठी वेळ लागला, त्यातून गैरसमज झाल्याचे नमूद केले आहे. मात्र यार्ची पूर्वसूचना देण्यात आर्ली नव्हती, असा दावा उमेदवारांकडून केला जात आहे.
संगमनेर शहरातील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील स्ट्रॉग रूममध्ये नगरपालिका निवडणुकीतील सर्व १५ प्रभागांतील मतदान यंत्रे कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत. सर्व उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि शासकीय प्रतिनिधी यांच्या समक्ष सील करण्यात आलेल्या या स्ट्रांग रूमवर सतत देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
आज दुपारी २ च्या सुमारास हे सीसीटीव्ही कॅमेरे अचानकपणे १५ ते २० मिनिटांसाठी बंद पडल्याची गंभीर बाब समोर आली. ही माहिती मिळताच संगमनेर सेवा समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे संपूर्ण शहरात संभ्रम आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मतदान यंत्रे आणि त्याची सुरक्षा ही लोकशाही प्रक्रियेतील अत्यंत संवेदनशील बाब मानली जाते. देशात आणि राज्यात पूर्वीपासूनच नागरिकांमध्ये मतदान यंत्रांबद्दल संभ्रम असताना, संगमनेरमध्ये घडलेल्या या प्रकाराने शंकांना अधिक बळ मिळाले आहे. कॅमेरे नेमके कशामुळे बंद पडले, याचे समाधानकारक उत्तर प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असलेल्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांना देऊ शकले नाहीत. प्रशासनाच्या या हलगर्जीपणाच्या कारभारावर नागरिकांनी क्रीडा संकुलाबाहेर ठिय्या देत तीव्र नाराजी व्यक्त केली.
सीसीटीव्ही बंद पडण्यामागील स्पष्टीकरण न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला. या प्रकरणी निवडणूक प्रशासनाने तातडीने खुलासा करून नागरिकांच्या शंका दूर कराव्यात व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
संगमनेर पालिकेचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दयानंद गोरे यांनी समाज माध्यमावर माहिती प्रसिद्ध करत, सीसीटीव्ही रेकॉर्डिंगची हार्ड डिस्क मेमरी भरल्याने बदलण्यात आली. त्यामुळे थोडा गैरसमज झाला. हार्ड डिस्क बदलताना व्हिडिओ शूटिंग करण्यात आले असल्याचे म्हटले आहे.
माजी नगराध्यक्ष तथा निवडणुकीतील उमेदवार विश्वासराव मुर्तडक यांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी ‘सत्ताधारी काहीही करू शकतात’ असे म्हटले आहे. स्ट्रॉग रूममधील सीसीटीव्ही कॅमेरे एक तास बंद पडणे, हा प्रकार नेमका काय आहे? याचे समाधानकारक उत्तर प्रशासनाने दिले पाहिजे. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी आम्हाला हार्ड डिस्क बदलताना हा प्रकार घडल्याचे सांगितले, तले, मात्र त्याची पूर्वसूचना उमेदवारांना दिली गेली नव्हती. निवडणूक आयोगाने पारदर्शक कामे करावीत अन्यथा जनतेचा विश्वास उडेल असे सांगताना त्यांनी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली.




