श्रीगोंद्यात डॉक्टरचे बंद घर फोडले ,साडेअकरा लाखांचा ऐवज लंपास


अहमदनगर टीम, :- शहरातील डॉ.विक्रम भोसले यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी कपाटातील तीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, २ लाख रुपयांची रोकड असा ११ लाख ५१ हजार ६५१ रूपयांचा ऐवज लुटून नेला.
ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. डॉ. विक्रम भोसले यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदे पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ.विक्रम भोसले यांचे शहरातील मांडवगण रस्त्यावर रुग्णालय आहे.
रुग्णालयाच्या पाठीमागच्या बाजूस ते वास्तव्यास आहेत. काल(८) डॉ.भोसले व त्यांचे कुटुंबीय नातेवाईकांकडे गेले होते. सकाळी घराची साफ सफाई करणाऱ्या कल्पना ससाणे या साफसफाईसाठी आल्या असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. याबाबतची माहिती ससाणे यांनी डॉ.भोसले यांना दिली.

चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरी कुणीच नसल्याने त्यांनी घरातील सामानाची उचकापाचक केली. कपाटातील सोन्याचे दागिने त्यामध्ये बोरमाळ,अंगठ्या, मंगळसूत्र, चैन असा तीस तोळे सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज व रोख दोन लाख असा ११ लाख ५१ हजार ६५१ रुपयांचा ऐवज लुटून नेला.

याबाबत पोलिसांना माहिती दिली असता घटनास्थळी श्वानपथक व फिंगरप्रिंट पथकास पाचारण करण्यात आले होते. मात्र त्यामधून तपासाच्या दृष्टीने फारसे काही हाती लागले नाही. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,

सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस कर्मचारी रोहिदास झुंजार, भारत खारतोडे यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी डॉ. विक्रम भोसले यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदे पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here