वर्धा, दि. 14 (जिमाका) :शेतीसाठी पाणी अंत्यत आवश्यक आहे परंतु गेल्या काही वर्षात पाण्याचा मोठया प्रमाणावर अनावश्यक वापर करण्यात आला आहे. सिंचनासाठी पाणी वापरतांना आता जपून वापरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असे मृद व जलसंधारण तथा रोहयोचे अपर मुख्य सचिव नंद कुमार यांनी सांगितले. सामाजिक न्याय भवनच्या सभागृहात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या हर खेत को पानी अर्थात प्रत्येक शेताला पाणी या योजनेचा श्री. नंद कुमार यांनी आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, निलेश घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे तसेच सर्व जिल्हास्तरीय अधिकारी, गटविकास अधिकारी, जलसंधारण विभागाचे अधिकारी व रोजगार हमी योजनेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येक शेतक-याला शेतीसाठी पाणी उपलब्ध करुन देऊन त्याची उत्पादन क्षमता पर्यायाने आर्थिक प्रगती साधावयाची आहे. शेती उत्पादनातून प्रत्येक शेतकरी किमान लखपती झाला पाहिजे. यासाठी यंत्रणेतील प्रत्येकाचे योगदान महत्वाचे आहे. शेतक-यासाठी सर्वांनी सर्व क्षमतेने काम करने आवश्यक आहे. प्रत्येक शेताला पाणी उपलब्ध करुन देऊन कोरडवाहू शेती हा शब्द आपल्याला गायब करायचा असल्याचे ते म्हणाले. शेतीसाठी पाणी वापराची कार्यक्षमता वाढली पाहिजे. त्यामुळे कमी पाण्यात अधिक क्षेत्र सिंचनाखाली कसे येईल तसेच पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब व मातीचा प्रत्येक कण अधिक उत्पन्न कसे मिळवून देतील याचा विचार झाला पाहिजे. मनरेगा अंतर्गत जास्तीत जास्त कामे उपलब्ध करुन दया. या कामांमधून मत्ता निर्माण झाली पाहिजे.

असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगितले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्हयातील सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यात येत असल्याचे सांगितले. मृद व जलसंधारण तसेच रोहयोच्या कामात जिल्हा निश्चितच चांगली कामगिरी करेल आणि यासाठी सर्व यंत्रणा आपल्या सर्व कार्यक्षमतेने सहकार्य करतील असे सांगितले.