शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल कराळे यांचे निधन
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते अनिल कराळे (वय 41) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. त्याचे मूळ गाव असलेल्या कामत शिंगवे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पूर्वीपासून शिवसैनिक म्हणून कार्यरत असलेले अनिल कराळे गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत तालुक्यातील करंजी मिरी गटातून धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आले होते. तर, त्यापूर्वी त्यांच्या पत्नी अनुराधा कराळे या याच गटातून अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. कामत शिंगवे येथील सेवा सोसायटी व ग्रामपंचायतीवर गेल्या 15 वर्षांपासून त्यांच्या गटाची सत्ता होती.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांचे ते कट्टर समर्थक होते. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर पुणे येथील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू होते. याकाळात शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी त्यांची भेट घेतली होती. अत्यंत आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख होती. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच कामत शिंगवे गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.



