शिर्डी येथील शेअर मार्केट घोटाळाः गुन्हे शाखेच्या पोलिसांनीच घेतली दीड कोटींची रक्कम – चौघे निलंबित

    72

    शिर्डीतील तब्बल 300 कोटींच्या गुंतवणूक फसवणुकीत आरोपी असलेल्या भूपेंद्र राजाराम साबळे याच्याकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनीच दीड कोटी रुपये उकळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशावरून या प्रकरणातील चार पोलिसांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.

    ‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनी’च्या नावाने गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी भूपेंद्र साबळेवर गुन्हा दाखल आहे. नाशिककडे पलायन करत असताना 15 जानेवारी 2025 रोजी लोणीजवळ त्याला पोलिसांनी अडवले. त्यावेळी त्याच्यासोबत त्याचे दोन भाऊ आणि एक मित्र होते.

    पकडीनंतर पोलिसांनी त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आणि त्याबदलीत दीड कोटी रुपये ऑनलाईन मागितल्याचे साबळेने चौकशीत कबूल केले आहे. लाच देण्याशिवाय पर्याय नसल्याचे समजल्यावर त्याने संबंधित खात्यावर पैसे ट्रान्सफर केले.

    निलंबित अधिकाऱ्यांची नावे अशी

    तुषार छबूराव धाकराव (पोलिस उपनिरीक्षक)

    मनोहर सीताराम गोसावी (हवालदार)

    बापूसाहेब रावसाहेब फोलाणे

    गणेश प्रभाकर भिंगारदे

    गुन्ह्याचा तपास आणि आंतरविषयक चौकशी सुरू

    या आर्थिक घोटाळ्याची प्राथमिक तक्रार राहाता पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानंतर शिर्डीतही तशीच तक्रार दाखल झाली. तपासादरम्यान आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी साबळेची चौकशी केली असता, पोलिसांकडून घेतलेल्या रकमेची माहिती उजेडात आली.

    या प्रकाराची गंभीर दखल घेत चौघा पोलिसांविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली असून, पोलिस अधीक्षकांनी चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.

    पोलिस अधीक्षक घार्गे यांचे स्पष्टीकरण”

    फसवणूक प्रकरणाशी संबंधित आरोपीकडून पोलिसांनी दीड कोटी रुपये घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रथमदर्शनी दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले असून, पुढील सखोल चौकशीसाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे.”

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here