शहरात मुस्लिम मावळ्यांनी केले शिवजयंती मिरवणुकीचे स्वागत

    270

    मिरवणुकीतील विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप

    अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे कापड बाजार येथे मुस्लिम समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

    तर मुस्लिम समाज, मोची गल्ली व्यापारी असोसिएशन व हाजी अजीजभाई चष्मावाला प्रतिष्ठानच्या वतीने मिरवणुकीत सहभागी विद्यार्थ्यांना पाणी व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

    या उपक्रमाचे प्रारंभ तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, मोची गल्ली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मन्सूर शेख व पोलीस उपनिरीक्षक कमलाकर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अकलाख शेख, नविद शेख, अन्सार पठाण, रमीज शेख, मोहसीन शेख, हमजा शेख, जव्वाद सय्यद, शाकिर शेख, योगेश बिंद्रे, सोहम बिंद्रे, मतीन शेख, तबरेज शेख, फयाज शेख, मुजाहिद पठाण, समीर शेख, रफिक रंगरेज, मुन्तझीम पठाण, उबेद शेख आदींसह मुस्लिम समाजातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाची शिकवण दिली असून, यानुसार मुस्लिम समाजातील युवकांनी घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी व्यक्त केली.

    मन्सूर शेख म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांनी जात, पंथ, धर्म असा भेदभाव कधी मानला नाही. अठरापगड जातीला बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. यामध्ये मुस्लिम मावळ्यांचा देखील वाटा होता. त्यांनी अनेक महत्त्वाची पदे मुस्लिम सरदारांकडे मोठ्या विश्‍वासाने सोपवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांनी आत्मसात केल्यास समाजा-समाजात कधी दुरावा व तेढ निर्माण होणार नसून, प्रत्येकाने शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन त्यांचा विचार अंगीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here