शहराची लाईफलाईन AMT शहर बससेवा आजपासून सुरू.

अहमदनगर ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर बससेवेला प्रशासनाने ब्रेक दिला होता. मात्र, जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे आता दोन महिन्यांनंतर जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू होत आहे. शहरातील इंजि.कॉलेज, निर्मलनगर निंबळक शाहूनगर व आलमगीर मार्गावर नियोजित वेळेवर आजपासून बस सेवा कार्यन्वित करण्यात आली आहे. शहरातील जनजीवन सुरळीत झाल्यामुळे महापालिका प्रशासनाने शहर बस सेवा सुरू करण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर केल्या महापालिका प्रशासनाने दीपाली ट्रान्सपोर्टला शहर बस सेवा सुरू करण्यास सांगितले. आज दीपाली ट्रान्सपोर्ट कडून 9 बस सुरू करण्यात आल्या आहेत. टप्प्याटप्प्याने मागणीनुसार शहर बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. दिवाळीपर्यंत सर्व बस सुरू करण्यात येणार आहेत. जुलै 2019 मध्ये नगर शहरात शहर बस सेवा सुरू करण्यात आली. याआधीही शहर बससेवा सुरू होती परंतु, काही कारणांमुळे ती बंद पडली. त्यानंतर महापालिका प्रशासनाने पुन्हा प्रयत्न करून शहर बससेवा सुरू केली. एकेकाळी टांग्याचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या नगर शहरातील वाहतुकीचे चित्र आधी दुचाकी, त्यानंतर रिक्षा आणि आता चारचाकी वाहनांनी बदलले गेले. शहरातील नागरिक तसेच बाहेरगावाहून येणारे नागरिक शहरांतर्गत वाहतुकीसाठी दुचाकी आणि रिक्षांचा वापर करीत आहेत. परंतु, आता त्यांना शहर बससेवेचाही पर्याय उपलब्ध झाला आहे. लॉकडाउन सुरू होण्यापुर्वी नगर शहरामध्ये 15 शहर बस विविध मार्गांवर धावत होत्या. साधारण पाच ते सहा हजार प्रवासी रोज प्रवास करीत होते. शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरातून या बस सुटुन. दिल्ली गेट, जिल्हा रुग्णालय, पाइपलाइन रोड, निर्मलनगर, निंबळक आणि भिंगार या भागांमध्ये धावत होत्या. शहर बसचा प्रवास सुरक्षित आहे आणि अन्य प्रवासी वाहनांच्या तुलनेत या बसचे प्रवास भाडेदेखील कमी आहे. त्यामुळे प्रवाशांकडून या बसला चांगला प्रतिसाद मिळत होता. शहरातील नागरिक तसेच बाहेरगावाहून येणारे नागरिकांची या बसमधील प्रवासाला पसंती मिळत असल्यामुळेे दिवसेंदिवस प्रवासी संख्येत वाढ झाली होती. शहरात काही ठिकाणी रस्ते खूप खराब आहेत, रस्त्यांना खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांना रिक्षात प्रवास करताना त्रास होत आहे तरीसुद्धा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बससेवा सुरू होत्या. शहरातील प्रवासी रिक्षांच्या तुलनेत या बसची संख्या तशी खूपच कमी आहे. तसेच, अडचणीदेखील जास्त आहेत; मात्र, असे असले तरी या अडचणींवर मात करून महापालिका प्रशासनाद्वारे बससेवा सुरू केली होती यामुळे दुसरीकडे शहर बससेवेस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. शहरातील केडगाव, बोल्हेगाव, तपोवन रोड, सारसनगर अशा अन्य उपनगरांतसुद्धा बससेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. आगामी काळात या बससेवेचा विस्तार करण्याचे प्रशासनाचे नियोजनही आहे. त्यानुसार आगामी काळात आणखी काही भागात बससेवा सुरू केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here