
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी एका व्यक्तीला अटक केली.
आरोपी सागर बर्वे हा एका खासगी कंपनीच्या डेटा फीडिंग आणि अॅनालिटिक्स विभागात काम करतो, असे मुंबई पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेने बर्वेला मुंबईत आणले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
बर्वे यांनी फेसबुकवर शरद पवार यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने धमक्या देण्यासाठी दोन बनावट खाती तयार केली होती.
कथित धमक्यांना प्रतिक्रिया देताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना माजी मुख्यमंत्र्यांसाठी सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राष्ट्रवादीशी वैचारिक मतभेद असले तरी प्रमुख विरोधी नेत्याला धमक्या देणे खपवून घेतले जाणार नाही, असे सांगितले होते.