शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता तर बरे वाटले असते’
अहमदनगर:
‘शरद पवार यांनी राज्यसभेतील खासदारांसोबत अन्नत्याग केला. मात्र पवार यांनी हा अन्नत्याग ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली, त्यावेळी केला असता तर मराठा समाजातील तरुणांना बरे वाटले असते,’ अशी टीका माजी मंत्री विनोद तावडे यांनी केली. ‘मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर दोन दिवसात राज्य सरकार १८ हजार पोलीस भरतीचा निर्णय करते. त्यावरूनच सरकारची नियत काय आहे व सरकार मराठा समाजाला कसे डावलते आहे, हे दिसून येतंय,’ असा आरोप ही त्यांनी केला.
दिवंगत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नगर शहर भाजपाच्यावतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी मंत्री विनोद तावडे हे उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी कृषि विधेयकावरून तावडे यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘शरद पवार साहेब स्वतः कृषिमंत्री होते. पवार यांना जर कृषी विधेयकामध्ये काही दुरुस्ती सुचवायच्या असत्या, तर त्यांनी राज्यसभेत बोलणे गरजेचे होते. शेतकरी हिताच्या दुरुस्त्या नक्कीच सरकारने स्वीकारल्या असत्या. पण केवळ विरोधासाठी विरोध शरद पवार यांच्यासारख्या माजी कृषिमंत्री व ज्येष्ठ नेत्याने करणे सामान्य शेतकऱ्याला पटलेले नाही,’ असेही तावडे यांनी स्पष्ट केले.






