वैद्यकीय पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया करणाऱ्या तिघा बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल

    189

    अहिल्यानगर (प्रतिनिधी):- वैद्यकीय पदवी नसताना, वैद्यकीय व्यावसायिक नसताना दवाखाना चालवून, रुग्णांवर शस्त्रक्रिया करणाऱ्या, अॅलोपॅथीची औषधे देणाऱ्या तिघा बोगस डॉक्टरांवर तपासणी करून महानगरपालिकेने कारवाई केल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. याप्रकरणी तिघाही बोगस डॉक्टरांवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत कायदेशीर फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

    पिंजारगल्ली येथील डॉ. ठाकूर क्लिनिक, चाँदसी दवाखाना डॉ. एम. डी. हालदार येथील ओम संतोष ठाकुर (रा. पिंजार गल्ली, अहिल्यानगर), मृत्युंजय धनंजय हालदार व त्यांचा मुलगा संजय मृत्युंजय हालदार (दोघे रा. पिंजार गल्ली, अहिल्यानगर) वैद्यकीय पदवी नसताना वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना बेकायदेशीरपणे रुग्णांची तपासणी करत असल्याचे त्यांच्यावर उपचार व शस्त्रक्रिया करत असल्याचे माहिती आरोग्य सेवा रुग्णालय (राज्यस्तर) मुंबई येथून महापालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानुसार महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना या संदर्भात कारवाईच्या सूचना देण्यात आले होत्या. प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजुरकर यांनी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप बाबासाहेब बागल, वैद्यकीय सहायक डॉ. कविता गणेश माने, मुख्य लिपीक सचिन अरुण काळभोर, वरिष्ठ परिचारिका स्नेहलता संजय पारधे-क्षेत्रे यांना तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

    डॉ. बागल यांच्या पथकाने १ एप्रिल रोजी पिंजारगल्ली येथे जाऊन दोन्ही क्लिनिकवर छापा टाकला. यावेळी संशयित बोगस डॉक्टर रुग्णांची तपासणी व उपचार करताना आढळून आले. तेथील रुग्णांकडे चौकशी केली असता, संशयित बोगस डॉक्टरांनी त्यांच्यावर मूळव्याध, भगंदर, फिशर आदी आजारांवर शस्त्रक्रिया केल्याचे समोर आले. पथकाने त्यांच्याकडे वैद्यकीय पदवीची मागणी केली असता, त्यांनी नॅचरोपॅथी, इलेक्ट्रॉपॅथी अशा डिप्लोमा कोर्सेसची प्रमाणपत्रे दाखवली. वैद्यकीय पदवीबाबत, अॅलोपॅथी उपचार, शस्त्रक्रियाबाबत कोणतीही पदवी दाखवली नाही. त्यानंतर डॉ. बागल यांच्यामार्फत फिर्याद दाखल करण्यात आली असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here