विक्रम गोखले म्हणाले, कंगना खरंच बोलली; शरद पवारांनी लावला गोखलेंच्या विधानाचा एका वाक्यात निक्काल

809

नाशिक: अभिनेत्री कंगना रणावतने स्वातंत्र्याबाबत जे विधान केलं ते खरंच आहे. कंगना खरं बोलली. मी तिच्या विधानाचं समर्थन करतो, असं अभिनेते विक्रम गोखले यांनी म्हटलं होतं. अशी माणसं असतात समाजात असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गोखले यांच्या  विधानाचा एका वाक्यात निकाल लावला आहे.

त्यांना दिवस मोजायचं काम करावं लागेल

काही दिवसांपूर्वी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सरकार कधीही कोसळणार असल्याची भविष्यवाणी केली होती. भाजपचे नेते अधूनमधून सरकार पडणार असल्याचं बोलत असतात. त्यावरही पवारांनी प्रतिक्रिया दिली. आज सरकार जाईल उद्या जाईल दिवस मोजायच काम त्यांना करावं लागेल, असा चिमटा पवारांनी काढला.

सुधारकांच्या विचारांवरच शैक्षणिक संस्थांचे जाळे

यावेळी त्यांनी शिक्षण क्षेत्रावरही भाष्य केलं. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराब देशमुख या सुधारकांच्या विचारांवर शैक्षणिक संस्थांचे जाळे महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. या शैक्षणिक संस्थांच्या विविध प्रश्नांना व्यासपीठ उभं करण्याचे काम कै. वसंतदादा पाटील यांनी केले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक नेत्यांनी शिक्षणाचे महत्वाचे काम हाती घेऊन शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. त्यात कर्मवीर भावराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज महाराष्ट्रातील सर्वात मोठी संस्था बनली असून या सामाजिक सेवकांनी उभ्या केलेल्या संस्था गोर गरिबांना शिक्षण देत आहेत, असे त्यांनी सांगितले.

फुल्यांनी 100 वर्षांचा विचार केला

महात्मा जोतीराव फुले यांच्या सोबत स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई यांनी आपले योगदान देऊन गोर गरीब मुलांना शिक्षण दिले. पुढील 100 वर्ष काय होणार आहे याबाबत दूरदृष्टी महात्मा फुले यांच्याकडे होती, असे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, शैक्षणिक संस्था आणि शिक्षक संघटनांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी आपण आग्रह धरण्यात येईल. महाविकास आघाडीतील मंत्री छगन भुजबळ आणि आपण स्वतः आपल्या विविध प्रश्नाबाबत मार्गी काढण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले. महानगरपालिका, नगरपालिका कायद्याबाबत व सार्वजनिक करप्रणालीबाबत फेरविचार करण्याची आवश्यक आहे. याबाबत नगरविकास मंत्री, अर्थ मंत्री, शिक्षण मंत्री यांच्यासमवेत बैठक घेऊन चर्चा करत तोडगा काढला जाईल. राज्यसरकरची आर्थिक परिस्थितीत कठीण असून सर्वच संस्थांच्या मागण्या पूर्ण करणे अवघड आहे. यासाठी मागणी करणाऱ्यांनी मागणी करतांना तुटेपर्यंत ताणवू नये असे त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here