वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देण्याच्या मोदींच्या आश्‍वासनाचे काय झाले?

पाटणा – बिहारमध्ये 19 लाख नोकऱ्या उपलब्ध करण्याचे आश्‍वासन देणाऱ्या भाजपच्या जाहीरनाम्याची कॉंग्रेसने खिल्ली उडवली आहे. वर्षाला 2 कोटी नोकरी देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्‍वासनाचे काय झाले, असा उपहासात्मक सवाल कॉंग्रेसने विचारला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाजपच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. त्या जाहीरनाम्यातून पुढील पाच वर्षांत बिहारचा विकास दर दुप्पट करण्याचे आश्‍वासनही देण्यात आले आहे. त्या आश्‍वासनांचा समाचार कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी पत्रकार परिषदेत घेतला.

सीतारामन यांच्या कार्यकाळात देशाच्या विकास दरात मोठी घसरण झाली. आता त्यांच्या हस्ते जारी झालेल्या जाहीरनाम्यातून बिहारचा विकास दर वाढवण्याची ग्वाही देण्यात आली आहे. भाजपचे नोकऱ्यांबाबतचे आश्‍वासन म्हणजे आणखी एक जुमला आहे.

जेडीयू-भाजप युतीने बिहारला उद्धवस्त केले आहे. मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार अकार्यक्षम ठरल्याचे केवळ कॉंग्रेसचे म्हणणे नाही. निती आयोगाच्या अहवालाने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे, असे ते म्हणाले.

भाजप आणि जेडीयूने बिहारमधील मागील निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढवली होती. त्यावेळी मोदी आणि नितीश यांनी एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्याची आठवण करून देणाऱ्या व्हिडीओ क्‍लीप सुर्जेवाला यांनी पत्रकार परिषदेत प्रसारित केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here