• 600 हेक्टरवर फळबाग लागवड पूर्ण
• 1233 शेतक-यांना मिळणार लाभ
• कृषीचा जिल्हाधिका-यांकडून आढावा
वर्धा, दि.9 (जिमाका) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्यात येते. यावर्षी जिल्हयात 1 हजार 20 हेक्टरवर फळबागांची लागवड करण्यात येणार आहे. 1 हजार 233 शेतक-यांना या योजनेअंतर्गत लागवडीसाठी लाभ दिला जाणार आहे. जिल्हयात योजने अंतर्गत जास्तीत जास्त फळबाग लागवडीचा कार्यक्रम घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी कृषी विभागाला दिल्या.
जिल्हाधिका-यांनी फळबाग लागवड योजना, सिंचन आराखडा, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, अपघात विमा योजना, पिक कापणी प्रयोग, कृषी पायाभूत निधी, पोकरा योजना, ग्राम बिजोत्पादनाचा आढावा घेतला. बैठकीला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, उपविभागीय कृषी अजय राऊत, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक वैभव लहाने, उमेदच्या स्वाती वानखेडे तसेच जिल्हयातील उपविभागी कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
फळबाग ही किफायतशिर आणि कमी खर्चाची शेती आहे. या शेतीचे क्षेत्र वाढविण्यासाठी फळबाग लागवड हा कार्यक्रम रोजगार हमी योजनेत समाविष्ठ करण्यात आला आहे. जिल्हयातील जास्तीत जास्त शेतक-यांना या कार्यक्रमात समाविष्ठ करण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावे, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
यावर्षी जिल्हयात 1 हजार 20 हेक्टरवर फळबाग लागवड केली जाणार आहे. तर जिल्हयातील 1 हजार 233 शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळतील. त्यापैकी आतापर्यंत 650 शेतक-यांनी सुमारे 600 हेक्टरवर फळबागाचे लागवड केली आहे. जिल्हयात वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, कारंजा या तालुक्यांमध्ये प्रत्येकी 120 हेक्टर, हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यात प्रत्येकी 180 हेक्टर तर आष्टी तालुक्यात 60 हेक्टरवर लागवड केली जाणार आहे.
शेतक-यांनी घरचे बियाणे वापरावे
जिल्हयात मोठया प्रमाणावर सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. सोयाबियाणच्या पेरणीसाठी प्रती हेक्टर 100 किलो इतके बियाणे लागतात. बियाणे महाग असल्याने शेतक-यांना बियाणे खरेदी परवडत नाही. त्यामुळे शेतक-यांनी सोयाबिनचे घरचेच बियाणे पुढील वर्षासाठी राखीव ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे. ग्राम बिजोत्पादन कार्यक्रमातंर्गत 1 लाख 30 हजार इतके बियाणे राखीव ठेवण्याचे कृषी विभागाने नियोजन केले आहे.
000





