लॅबची तपासणी, उपजिल्हा रूग्णालय गडहिंग्लज रिफिलींग क्षमता वाढविण्याचा निर्णय मोठ्या गावाच्या ठिकाणी स्वॅब घेण्याची सोय करा -पालकमंत्री सतेज पाटील

685


कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय) : मोठ्या गावाच्या ठिकाणी स्वॅब घेण्याची सोय करावी, गेल्यावर्षीची सर्व कोविड काळजी केंद्रे सुरू करावीत त्याशिवाय नवीन केंद्राबाबतही पाहणी करावी, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड तपासणी कोविड प्रयोगशाळेची तपासणीची क्षमता वाढविणे, गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालय येथे ऑक्सीजन रिफिलींग क्षमता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.


पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, संशयिताचा स्वॅब घेतल्यानंतर त्याचा अहवाल येईपर्यंत जर त्यांच्या घरी स्वतंत्र व्यवस्था नसेल तर, त्यास अलगीकरण कक्षात ठेवावे. प्रत्येक कोविड काळजी केंद्रात स्वॅब घेण्याची सोय करावी आणि त्यासाठी वेळ निश्चित करावी. ज्या तालुक्यात जास्त रूग्ण सापडत आहेत त्या ठिकाणी उपाययोजना राबविण्याबाबत लक्ष केंद्रित करावे.
महापालिकेने लक्षतीर्थ येथील रूग्णालय ऑक्सीजनेटेड बेड तयार करण्याबाबत प्रस्ताव द्यावा. त्याचबरोबर आयसोलेशन ऑक्सीजन जनरेटर बसविण्याबाबत प्रक्रिया पूर्ण करावी. मुरगूड, गडहिंग्लज, राधानगरी, चंदगड, मलकापूर याठिकाणी ऑक्सीजन लाईन करण्याबाबत प्रस्ताव सादर करावा. सी.पी.आर.मधील नादुरूस्त असलेले व्हेंटिलेटर्स दुरूस्त करण्याबाबत कंपनीशी संपर्क साधावा, असेही पालकमंत्री म्हणाले.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, कोल्हापूरसाठी 100, गडहिंग्लज-50 आणि इचलकरंजी येथील आय.जी.एम. साठी जम्बो ऑक्सीजन सिलेंडर भरून राखीव ठेवावेत. ऑक्सीजन कॉन्संट्रेटर खरेदी करण्याबाबत प्रस्ताव पाठवावा. सद्यस्थितीत 15 कोविड काळजी केंद्र सुरू असून गतवर्षीची सर्व केंद्रे टप्याटप्याने सुरू करावे. त्याचबरोबर नवीन सुरू करण्यासाठीही ठिकाणांची पाहणी करावी. आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करावी. लवकरच डॅश बोर्ड आणि नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, डॉ. उत्तम मदने, अधिक्षक अभियंता व्ही.ए.गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here