
रेल्वे अपघातात ज्यांना जीव गमवावा लागला आहे आणि अपघातात जे जखमी झाले आहेत त्यांच्या नातेवाईकांना आणि जखमींना आता दहापट अधिक भरपाई देणार असल्याचं रेल्वे बोर्डाने जाहीर केलं आहे. त्यानुसार आता रेल्वे अपघातात ज्यांना जीव गमवावा लागला आहे त्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वेच्या चुकीमुळे अपघात झाला तरीही त्याला आता भरपाई देण्यात येणार आहे.

रेल्वेच्या अपघातात जीव गमवावा लागलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना पहिले 50 हजार रुपयांची रक्कम भरपाई म्हणून देण्यात येत होती. आता त्यात 10 पट वाढ झाल्याने अशा प्रवाशांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत मिळणार आहे. तसेच गंभीर जखमी रुग्णांना यापूर्वी 25 हजार रुपये देण्यात येत होते. आता ती रक्कम अडीच लाख रुपये एवढी करण्यात आली आहे. तसेच किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना पूर्वी 5 हजार रुपये मदत दिली जात होती ती आता वाढवून 50 हजार रुपये एवढी करण्यात आली आहे.