राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 34 लाभार्थ्यांच्या
गुंतागुंतीच्या ह्रदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण
पालकमंत्री जयंत पाटील व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली लाभार्थ्यांची भेट
सांगली दि. 14 (जि.मा.का) : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सन 2021-22 मध्ये पात्र ठरलेल्या 40 बालकांना ओपनहार्ट ह्दय शस्त्रक्रिया पूर्ण करण्याकरिता दिनांक 09 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथून मुंबई येथील एस.आर.सी. सी. रुग्णालय, येथे पाठविण्यात आले होते. दिनांक 10 सप्टेंबर 2021 अखेर 40 पैकी 34 लाभार्थ्यांच्या गुंतागुंतीच्या अतिखर्चिक ओपन हार्ट यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. शिबीरातील लाभार्थी व पालकांना पालकमंत्री जयंत पाटील यांनी रूग्णालयात भेट देवून त्यांची विचारपूस केली व लाभार्थ्यांच्या सर्व सोयीबद्दल आवश्यक त्या सर्व सूचना रूग्णालय प्रशासनास दिल्या. तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील शिबीराच्या पहिल्याच दिवशी लाभार्थी व पालक यांना समक्ष भेट देवून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मोफत इको तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. माहे मार्च 2020 पासून कोविड आपत्तीमुळे अंगणवाडी व शाळा बंद असल्याने बालक व विद्यार्थी यांची तपासणी होऊ शकली नाही. मात्र राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतील पथकांनी मागील काळामधील दिलेल्या उत्कृष्ठ आरोग्य सेवेमुळे प्रत्येक तालुकास्तरावर त्यांचा जनसंपर्क वाढला व त्यातूनच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांच्या मदतीने ह्रदय रोग संशयित बालकांची यादी तयार झाली. तसेच पालकांनी देखील पथकाशी थेट संपर्क साधून आपल्या बालकांची नावे नोंदविली. त्यातूनच इको शिबीराचे आयोजन करण्यात आले.
इको तपासणीमधून ह्रदय शस्त्रक्रियेसाठी 40 लाभार्थी पात्र झाल्याचे निदर्शनास आले. लाभार्थी व पालक यांना 2 बसची व्यवस्था करुन मोफत प्रवास, भोजन, निवास, पुर्व तपासणी व मोफत ह्रदय शस्त्रक्रियाकरिता दिनांक 09 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथून मुंबई येथील एस.आर.सी. सी. रुग्णालय, येथे पाठविण्यात आले होते. दिनांक 10 सप्टेंबर 2021 अखेर 40 पैकी 34 लाभार्थ्यांच्या गुंतागुंतीच्या अतिखर्चिक ओपन हार्ट यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. शस्त्रक्रिया पश्चात किरकोळ गुंतागुंत वगळता शस्त्रक्रिया दरम्यान अथवा शस्त्रक्रियेनंतर एकाही लाभार्थ्याचा मृत्यू झाला नाही. उर्वरित लाभार्थ्यांच्या शस्त्रक्रिया नियोजित आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक संजय साळुंखे यांनी दिली.
00000