राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानः बियाणे, सुधारीत अवजारे इ.साठी शेतकऱ्यांकडून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागविले

721

अकोला,दि.२५(जिमाका)- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन २०२१-२२ मध्ये – अन्नधान्य पिके व गळीत धान्य अंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण,पीक प्रात्यक्षिके, सुधारीत कृषी अवजारे व सिंचन सुविधा साधने या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांकडून महाडीबीटी प्रणालीदारे अर्ज मागविण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी सोमवार दि.३० ऑगस्ट ते शुक्रवार दि.१० सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत अन्न धान्य पिके व गळीतधान्य कार्यक्रम खालील जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येतो.
त्यात, कडधान्य हरभरा – राज्यातील सर्व जिल्हे, पौष्टिक तृणधान्य – नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापुर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातुर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
बियाणे वितरण-
संबंधित जिल्ह्यांमध्ये हरभरा बियाण्यासाठी १० वर्षाआतील वाणास २५ रुपये प्रति किलो, १० वर्षावरील वाणास १२ रुपये प्रति किलो व रब्बी ज्वारी बियाण्यासाठी १० वर्षा आतील वाणास ३० रुपये प्रति किलो, १० वर्षावरील वाणास १५ रुपये प्रति किलो या प्रमाणे एकूण किंमतीच्या ५० टक्के मर्यादित अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला दोन हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे.
पीक प्रात्यक्षिके-
पीक प्रात्यक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार असल्याने पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज करताना संबंधित कृषी सहाय्यकांशी संपर्क करून १० हे. क्षेत्र असणाऱ्या गटांनी नोंदणी करावी. पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादेत निविष्ठा स्वरुपात अनुदान उपलब्ध करुन दिले जाते. बियाणे,जैविक खते, सुक्ष्म मूलदव्ये, भू-सुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्यांना एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधित पिकाच्या प्रकारानुसार दोन ते चार हजार रुपये प्रति एकर मर्यादेत डी. बी. टी. तत्वावर अनुदान अदा करण्यात येते. यासाठी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे. शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होणार आहे,असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. के.बी. खोत यांनी कळविले आहे.
000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here