पुणे : केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमांच्या ठिकाणी आंदोलन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षांसह 40 जणांविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंदोलनप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी 60 ते 70 कार्यकर्त्यांना सोमवारी ताब्यात घेतले होते. सेनापती बापट रस्त्यावरील पंचतारांकीत हॉटेलमध्ये इराणी यांचा सोमवारी कार्यक्रम होता.
याच हॉटेलमध्ये इराणी उतरल्या होत्या. दरम्यान, संबंधित कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे अनुचित घटना घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह 60 ते 70 कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी संबंधित हॉटेलच्या परिसरात महागाई विरोधी आंदोलन केले.
यावेळी चतुःशृंगी पोलिसांनी 60 ते 70 जणांना ताब्यात घेऊन सोडून दिले होते.
दरम्यान, संबंधित कार्यक्रमाच्या ठिकाणी आंदोलन केल्याप्रकरणी शहराध्यक्ष जगताप, प्रदीप देशमुख, महेश हांडे, उदय महाले, राजु साने, मृणाल वाणी, अनिता पवार आदी 40 पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मुंबई पोलिस अधिनीयमानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.