भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे पक्षाचे जेष्ठ नेते तथा राज्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहण कार्यक्रमास खासदार सुप्रियाताई सुळे उपस्थित होत्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार सन्माननीय गृहमंत्री व खा. सुप्रियाताईंच्या उपस्थितीत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना राज्यघटनेशी कटीबद्ध राहण्याची शपथ देण्यात आली.

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणार्पण करणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करताना गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांनी ७५व्या स्वातंत्र्यदिनी कार्यकर्त्यांसमोर आपले विचार मांडले. भारताचे स्वातंत्र्य असेच तेवत राहण्यासाठी देशातील सर्व जाति-धर्माच्या लोकांनी गुण्यागोविदांने नांदावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोरोना हे मोठे संकट देशावर आले आहे. त्याचा सामना मागील दीड वर्षांपासून आपण करत आहोत. या आपत्तीवर मात करण्याचा आपण प्रयत्न केला त्यामुळे आजचे चित्र बदलले आहे. पुढील वर्षाचा स्वातंत्र्यदिन आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल, अशी भावना माननीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केली. ७५ वर्षांच्या टप्प्यात काँग्रेस राजवटीत देशाने शेती, उद्योग, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रात भरारी घेतली. ते सगळ्यांच्या स्मरणात रहायला हवे. ही प्रेरणा घेऊन भविष्यात भारताला एक महान राष्ट्र बनविण्यासाठी आपण काम करू असे आवाहन ना. दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी केले.

खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले की, मागील दीड वर्षे आपण कोरोना महामारीचा मुकाबला करत आहोत. या काळात पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने व देशाच्या प्रत्येक नागरिकाने दिलेल्या योगदानातून कोरोना संक्रमणावर आपण बऱ्यापैकी मात करू शकलो. या काळात डॉक्टर, परिचारीका, आंगणवाडी सेविका, राज्याचे प्रशासन व महाविकास आघाडी सरकार या सर्वांनी जे काम केले त्याबद्दल सुप्रियाताईंनी सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच राज्यातील रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर येथे आलेल्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मोलाच्या कामगिरीची देखील दखल खासदार सुप्रियाताईंनी घेतली व त्यांचे आभार व्यक्त केले.
या राष्ट्रध्वजारोहण समारंभाला मा.आ.विद्याताई चव्हाण, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सेवा दल प्रदेशाध्यक्ष दिपक मानकर, सेवा दल उपाध्यक्ष जानबा म्हस्के, मुंबई विभागीय युवक अध्यक्ष निलेश भोसले, सामाजिक न्याय सेल मुंबई विभागीय अध्यक्ष सुनील शिंदे, मुंबई विभागीय अल्पसंख्याक सेल अध्यक्ष सोहेल सुभेदार, सिध्दिविनायक मंदिर विश्वस्त सदस्या आरती साळवी, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष विजय वाडकर, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष धनंजय पिसाळ तसेच पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Dilip Walse Patil Supriya Sule