राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालाय; शिवसेना नेत्याचा पवारांवर निशाणा

The Union Minister for Heavy Industries and Public Enterprises, Shri Anant Geete addressing the gathering, on the occasion of the Public Sector Day, in New Delhi on April 11, 2017.

राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालाय; शिवसेना नेत्याचा पवारांवर निशाणा

राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीत सर्वच आलबेल असल्याचा दावा नेत्यांकडून केला जात असला, तरी प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांची घुसमट होतं असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यानंतर शिवसेनेचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर टीकेचा बाण डागला आहे.अनंत गीते नेमकं काय म्हणाले? राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे, असं अनंत गीते यांनी म्हटलं आहे. ते रायगडमध्ये बोलत होते. श्रीवर्धन तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पक्ष प्रवेश सोहळा होता. यावेळी अनंत गीते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांशी जाहीर बोलताना, त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत भाष्य केलं.मी शिवसेनेचा नेता म्हणून बोलतोय. शिवसेना काय आहे हेच फक्त सांगणार आहे. राज्यात आपलं सरकार आहे. आपलं कशासाठी म्हणायचं तर मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. आघाडीचं सरकार आहे. शिवसेनेचं नाही. सरकार आघाडी सांभाळेल. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील. तुमची-माझी जबाबदारी गाव सांभाळायची आहे. आपलं गाव सांभाळात असताना आघाडीचा विचार करायचा नाही. आम्हाला फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे. दोन्ही काँग्रेस हे कधी एकमेकांचे तोंड बघत नव्हते. यांची विचारांची सांगड बसत नव्हती. एक मतं नव्हती. दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एकविचाराची कदापी होऊ शकणार नाही. ते दोन एक होऊ शकत नाहीत , मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. दोन काँग्रेस एकत्र येऊ शकत नाहीत, तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणे कदापी शक्य नाही, असं अनंत गीते म्हणाले.कोण आहेत अनंत गीते?अनंत गीते हे रायगडमधील शिवसेनेचे बडे नेते आहेत. 2014 मध्ये मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये ते केंद्रीय अवजड उद्योगमंत्री होते. मात्र 2019 च्या निवडणुकीत तत्कालिन शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री असलेले अनंत गीते पराभूत झाले होते. रायगड लोकसभा मतदारसंघातून अनंत गीते निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांचा पराभव केला. अनंत गीते यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून 2009 आणि 2014 साली विजय मिळवला होता. 2014 साली अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पराभूत केले होते. त्यावेळी अनंत गीते हे केवळ 2100 मतांनी विजयी झाले होते. मात्र 2019 मध्ये सुनील तटकरे यांनीच अनंत गीते यांना पराभूत करुन, गेल्या वेळीच्या पराभवाचा वचपा काढला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here