राष्ट्रध्वजाच्या निर्मिती केंद्राला भेट देवून पालकमंत्री अशोक चव्हाण जेव्हा भावूक होतात

451

नांदेड येथील राष्ट्रध्वज निर्मिती प्रकल्पाला अधिक सक्षम करु

  • पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड दि. 17 (जिमाका) :- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्याचे, स्वावलंबनाचे, स्वदेशीचे जे प्रतिक आहे त्या खादीकडे कृतज्ञतेने मी पाहत आलो आहे. खादीच्या वस्त्रात स्वावलंबनाची बिजे दडलेली आहेत. येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीशी आणि समितीच्या या राष्ट्रध्वज निर्मिती केंद्राशी स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्यापासून एक वेगळी कटिबध्दता आम्ही जपत आलो आहोत. स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत असताना स्वातंत्र्याच्या अस्मितेचे प्रतिक असलेल्या या राष्ट्रध्वज निर्मिती व खादी निर्मिती प्रकल्पाच्या नुतनीकरणासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करु असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

राष्ट्रध्वज निर्मितीचे आएसआय मानाकंन असलेले भारतातील सर्वांत जुने केंद्र म्हणून गणल्या गेलेल्या नांदेड येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या खादी निर्मिती प्रकल्पास त्यांनी आवर्जून भेट देवून प्रत्यक्ष पाहणी केली. सन 1963 मध्ये मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीची रितसर स्थापना करुन 1967 पासून या केंद्रावर विविध आकारातील मागणीप्रमाणे राष्ट्रध्वजाची निर्मिती केली जाते. याचबरोबर खादी वस्त्र आणि इतर साहित्याचीही निर्मिती केली जात होती. कागद निर्मितीचा प्रकल्प अडचणीमूळे बंद करण्यात आला. या खादी निर्मिती प्रकल्पाचे ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेवून या केंद्राला नव्या स्वरुपात पुन्हा उभे करण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भेट देवून विश्वस्ताची सविस्तर चर्चा केली. यावेळी समितीचे सचिव ईश्वरराव भोसीकर, हंसराज वैद्य व इतर पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे स्वागत केले.

इथे भेट देवून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला खादी निर्मितीच्या प्रकल्पामध्ये नांदेड येथील हा प्रकल्प कर्नाटकातील राष्ट्रध्वज निर्मिती प्रकल्पा बरोबर भारताच्या अस्मितेचे हे प्रतिक आहे. महात्मा गांधी यांनी स्वत: सूत कातून खादी निर्मिती अर्थात कपड्याची निर्मिती करुन त्यांचा वापर करण्यापाठीमागे स्वावलंबी जीवनाचा व्यापक अर्थ दिला आहे. स्वातंत्र्याची प्रेरणा ही खादी निर्मिती आणि त्यांच्या वापरातूनही आहे. यांचा अधिकाधिक वापर करुन स्वदेशीचा मंत्र ठरणाऱ्या अशा प्रकल्पास चालना देण्यासाठी मंत्रालयीन पातळीवर लवकरच निर्णय घेवू असेही त्यांनी स्पष्ट केले. सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी आठवड्यातील एक दिवस खादीच्या वापरासमवेत कार्यालयीन गरजेतही अधिकाधिक खादीचा वापर कसा केला जाईल यांचेही नियोजन करुन धोरणात्मक निर्णय घेवू असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here