
नगर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, ही सरकारची भूमिका आहे. यात सरकार कुठेही कमी पडणार नाही. यापूर्वी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्री असताना समाजाला मिळालेले आरक्षण पुन्हा प्रस्तापित होणे हाच सरकारचा प्रयत्न आहे. आरक्षण दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. परंतु, आता तरुणांनी विराेधकांकडून हाेत असलेल्या बुद्धीभेदाला बळी पडू नये, असे आवाहन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली.
जालना येथील घडलेल्या घटनेबाबत बाेलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, ”या घटनेचे समर्थन मुळीच नाही, या घटनेबाबत सरकारने चौकशीचे सर्व आदेश दिलेले आहेत. दोषींवर निश्चित कारवाई होईल, असे स्पष्ट करुन केवळ आता आरक्षणाच्या प्रश्नावरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचा प्रयत्न जाणीवपुर्वक केला जात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, राज्यात मुख्यमंत्री पदावर असताना देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळेच मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले होते. मात्र, मागील अडीच वर्षे राज्यात आघाडी सरकार सत्तेवर होते. आरक्षणाच्या मुद्यावर या सरकारने गंभीरतेने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळेच मराठा समाजाच्या हक्काचे आरक्षण गमवावे लागले, हे सुद्धा दुर्लक्षित करुन चालणार नाही.
मागच्या सरकारमुळे गेलेले आरक्षण पुन्हा प्रस्तापित करण्यासाठी राज्य सरकारने सर्वतोपरी प्रयत्न सुरु केले आहे. समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, ही सरकारची भूमिका असल्याचे सांगून आरक्षण मिळविण्यासाठी सरकारची भावना अतिशय गंभीर आणि प्रामाणिक आहे. त्यामुळे समाजबांधवांनी शातंता राखण्याचे आवाहन करुन, विरोधकांकडून होत असलेल्या बुद्धीभेदाला बळी पडू नये, असेही त्यांनी सूचित केले आहे.