
कोकण किनारपट्टीसह मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मागील 24 तासांमध्ये अंशतः ढगाळ हवामान पाहायला मिळालं. तर, मराठवाडा, विदर्भात मात्र पारा चांगलाच वाढल्याचं लक्षात आलं. अकोल्यामागोमाग मालेगावातही पारा चाळीशीपार पोहोचला असून, 43 ते 44 अंशांदरम्यानच्या तापमानानं नागरिकांची चांगलीच होरपळ केली.
पुढील 48 तासांमध्ये राज्यात पुन्हा एकदा हवामान बदल पाहायला मिळणार असून, पुन्हा अवकाळीचे ढग राज्यावर दाटून येताना दिसतील. ज्यामुळं पूर्व विदर्भाला उन्हाळी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. विदर्भात प्रामुख्यानं अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.
विदर्भाला मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीचा इशारासुद्धा देण्यात आला असून, रविवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळं कोल्हापूर, सांगली, सोलापूर, आणि सोबतच मराठवाड्याच धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.