मुंबई : देशात इंधन दरवाढ सुरुच असून महागाईमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. ही दरवाढ सुरु असतानाच शुक्रवारी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडकडून (IGL) देशांतर्गत पीएनजी आणि सीएनजी गॅसच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात (CNG) 80 पैसे प्रति किलो आणि पीएनजीच्या (PNG) दरात 5.85 रुपये प्रति घनमीटर म्हणजेच 16.5 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 24 मार्च रोजी देखील पीनजीच्या दरात 1 रुपयांची वाढ करण्यात आली होती. तर आता पुन्हा एकदा पीनजीचे दर वाढवण्यात आले आहेत. गेल्या महिन्याभरात सीएनजी आणि पीएनजीमध्ये सहाव्यांदा वाढ करण्यात आली आहे. एकीकडे राज्यात राज्य सरकारने सीएनजीवरील व्हॅट कमी केल्याने दर कमी झाले आहेत. तर दुसरीकडे मात्र गॅस कंपन्यांनी सीएनजीच्या दरात वाढ केल्याने मोठा विरोधभास पहायला मिळत आहे.
व्हॅट कमी करण्यात आल्याने राज्यात शुक्रवारपासून सीएनजी आणि पीएनजीचे दर स्वस्त झाले आहेत. जीएनजीच्या दरात सहा रुपयांची तर पीएनजीच्या दरात साडेतीन रुपयांची घसरण झाली आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये सीएनजीवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर लगेचच सीएनजीवरील व्हॅट कमी करण्याची अधिसूचना देखील काढण्यात आली होती. अखेर एक एप्रिलपासून आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसांपासून सीएनजी आणि पीएनजीचे नवे दर लागू करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार सीएनजीमध्ये सहा रुपयांची तर पीएनजीमध्ये साडेतीन रुपयांची घसरण झाली आहे. मुंबईत आता सीएनजीची किंमत साठ रुपये प्रति किलो झाली आहे.
राज्य सरकारच्या तिजोरीवर ताणराज्य सरकारने सीएजीवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मोठा आर्थिक ताण राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. व्हॅट कमी झाल्याने राज्यात सीएनजीचे दर सहा रुपयांनी तर पीएनजीचे दर साडेतीन रुपयांनी स्वस्त झाले आहेत. मात्र राज्याने व्हॅट कमी करताच कंपन्यांकडून दर वाढवण्यात आल्याने नागरिकांना स्वस्त सीएनजीचा आनंद फार काळ घेता येईल असे वाटत नाही.