
राज्यात साथीच्या आजारांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं… डोळे येणं, इन्फ्ल्यूएन्झा, मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया आणि लेप्टोच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या ही डोळे येणाऱ्या रुग्णांची असून 4 लाखाच्या घरात आहे. राज्यात 16 ऑगस्टपर्यंत 4 लाखांच्या जवळपास लोकांना डोळ्यांचा संसर्ग झाल्याची आकडेवारी आरोग्य विभागानं जाहीर केली.
तर यापाठोपाठ डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचे रुग्ण आहेत. याशिवाय लेप्टो, इन्फ्ल्यूएन्झाचे रुग्णसंख्याही वाढली आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या ही मुंबईमधली असून राज्यात इतर भागातही साथीच्या रोगांचा संसर्ग बळावला आहे, त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. काही अभ्यासकांच्या मते, यापूर्वी इतकी रुग्णसंख्या कधीही पाहण्यात आली नव्हती.
देशातील जवळपास अर्धा डझन राज्यांना संसर्गजन्य आजारांच्या वाढत्या प्रकोपामुळे मार्गदर्शक सूचना जारी कराव्या लागल्या आहेत. अलीकडच्या काळात आय फ्लू किंवा किंवा कंजेक्टिव्हायटिस म्हणजेच डोळे येण्याची साथ ही एक जागतिक आरोग्य चिंता ठरली आहे. एका आकडेवारीनुसार, जगभरात या आजारांवरील उपचारांच्या औषधांची उलाढाल चार अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे.