राज्यात शिख समाजासाठी आनंद विवाह नोंदणी कायदा लागू असून संबंधित शासकीय विभागांनी अंमलबजावणी करावी – नवाब मलिक

423

राज्यात शिख समाजासाठी आनंद विवाह नोंदणी कायदा लागू असून संबंधित शासकीय विभागांनी अंमलबजावणी करावी – नवाब मलिक

मुंबई, दि. ११ ऑगस्ट – राज्यात शिख समाजासाठी आनंद विवाह नोंदणी कायदा लागू करण्यात आला असून संबंधित शासकीय विभागांनी त्याची अंमलबजावणी करावी. तसेच आनंद विवाह नोंदणी प्रक्रिया सुलभ पद्धतीने होण्यासाठी वेबसाईटवर ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज बैठकीत दिल्या.

यावेळी मंत्री नवाब मलिक यांनी आनंद मॅरेज ॲक्टविषयक महाराष्ट्र शासनाच्या राजपत्राची प्रत पुणे येथील गुरुद्वारा श्री गुरु सिंघ सभेचे अध्यक्ष भोला सिंघ अरोरा यांना सुपुर्द केली.   

यावेळी आमदार रोहित पवार, अल्पसंख्याक विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी, विधी व न्याय विभागाचे सहसचिव बनकर, अल्पसंख्याक विकास विभागाचे उपसचिव सोनवणे यांच्यासह महसूल, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी, गुरुद्वारा श्री गुरु सिंघ सभेचे अध्यक्ष भोला सिंघ अरोरा, गुरुद्वारचे सरचिटणीस रामिंदर सिंग राजपाल, वीरेंद्र किराड, समीर शेख आदी उपस्थित होते.

राज्यात आनंद मॅरेज ॲक्ट लागू करण्यात यावा यासाठी मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत फेब्रुवारी २०२० मध्ये बैठक झाली होती. या बैठकीत मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत संबंधितांना सूचना दिल्या होत्या. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संपर्क करून शिख समाजाच्यावतीने विनंती करण्यात आली होती. तसेच आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेऊन अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांच्यासमवेत १० फेब्रुवारी २०२० रोजी बैठक झाली होती. त्यानंतर २३ एप्रिल २०२० रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने यासंदर्भात अधिसूचना प्रसारीत केली.

८ जून २०१२ रोजी केंद्रामार्फत शिख समाजातील विवाह नोंदणीकरीता राजपत्राद्वारे सर्व राज्यांना आदेश देण्यात आले होते की, शिख समाजातील विवाह नोंदणीकरिता तयार करण्यात आलेला आनंद मॅरेज ॲक्ट प्रत्येक राज्याने लागू करावा. हा कायदा राज्यात लागू व्हावा यासाठी गुरुद्वारा श्री गुरु सिंघ सभेचे अध्यक्ष भोला सिंघ अरोरा यांनी पाठपुरावा केला होता.

मंत्री नवाब मलिक यांनी अल्पसंख्याक विकास, विधी व न्याय, सार्वजनिक आरोग्य तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचित केले की, आनंद मॅरेज ॲक्टच्या नोंदणीची प्रक्रिया ही वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीनेही उपलब्ध झाली पाहिजे. त्याचप्रमाणे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व कटक मंडळ यांचेकडे नोंदणी अर्ज पोहोचविण्यात यावेत अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

गुरुद्वाराचे अध्यक्ष भोला सिंघ अरोरा यांनी शासनाचे तसेच मंत्री नवाब मलिक, आमदार रोहित पवार यांचे आभार मानले. शिख समाजाचे आनंद मॅरेज ॲक्ट राज्यात लागू झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here