
◼️ महाराष्ट्रात सध्या पावसाने थैमान घातले असून कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईसह उपनगरांमध्येही पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.हवामान खात्याने पुढील 24 तासांसाठी मुंबईत मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे तर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
तसेच हवामान खात्याने कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावरील काही भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, रायगड, सातारा, गडचिरोली, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, भंडारा, नागपूर, गोंदिया, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असलेला कमी दाबाचा पट्टा हा पावसाच्या वाढत्या जोराचे प्रमुख कारण आहे. यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर कोकणापासून गोव्यापर्यंत पावसाची हजेरी अपेक्षित आहे.
हवामान खात्याने आज संपूर्ण राज्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पावसाचा जोर पुढील काही दिवस वाढण्याची शक्यता आहे. यामुळे पूर, भूस्खलन आणि पाणी साचण्याचा धोका वाढला आहे. विशेषतः घाटमाथ्यावरील भागात भूस्खलनाचा धोका जास्त आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.