
संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन करा, मी एका दिवसांत ५०० कोटी रुपये घेऊन येतो, असे अजित पवार यांनी म्हटले होते. अजित पवार यांच्या या वक्तव्याचा संजय राऊत यांनी समाचार घेतला.राज्यात दोन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफीची योग्य वेळ कोणती?
संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न राज्यात महायुती सरकार आल्यापासून दोन हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामधील बहुतेक आत्महत्या या कर्जबाजारीपणामुळे झाल्या आहेत. सत्तेवर येण्यासाठी महायुतीने निवडणुकीच्या तोडांवर कर्जमाफीची घोषणा केली होती. परंतु आता देवेंद्र फडणवीस म्हणतात, योग्य वेळी कर्जमाफी करु. ही योग्य वेळ कधी येणार? असा प्रश्न शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारला.पुण्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, शेतकरी कर्जमाफीसंदर्भात सरकार संवेदनशील आहे. कर्जमाफी कधी करायची, या संदर्भातील काही नियम आहेत.
त्याची एक पद्धती आहे. योग्यवेळी हा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्याचा समाचार संजय राऊत यांनी घेतला. ते म्हणाले, लाडक्या बहिणींना वेळेवर पैसे देता येत नाही, शेतकऱ्यांचे कर्जमाफ करता येत नाही, पण माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन करा, मी एका दिवसांत ५०० कोटी रुपये घेऊन येतो, असे अजित पवार म्हणत आहेत. ते राष्ट्रीय नेते आहेत, पण अजूनही गावातच फिरत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर केली.मनसे शिवसेना उबाठा युती होणार?मनसे आणि शिवसेना उबाठा युतीवर राऊत म्हणाले, ठाकरे बंधूंना मी अनेक वर्षांपासून ओळखत आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेतेच मनसे आणि शिवसेना उबाठा युतीबाबत निर्णय घेतील. आज जे राजकारणात आले, त्यांच्या मताला मी काहीच महत्व देत नाही. आज महाराष्ट्राचा अस्तित्वाचा प्रश्न आहे. यामुळे संयम आणि त्याग गरजेचा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही वेगळ्या विचाराचे लोक एकत्र आले होते, हा इतिहास आज राजकारणात आलेल्या लोकांनी लक्षात घ्यावा, असे संजय राऊत यांनी सांगितले.





