राज्यातील सर्व नोकरभरतीच्या परीक्षा महाराष्ट्र राज्य सेवा आयोगामार्फत घ्याव्यात, अन्यथा ऑल इंडिया युथ फेडरेशनच्यावतीने राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा !

595

राज्यात साधारण दहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, यासाठी अनेकांनी आपले आयुष्य पणाला लावले आहे, मात्र यातील काहीजण प्रलोभनाला बळी पडून कमी वेळेत यशस्वी होण्यासाठी इतर पर्याय शोधतात. यावर अनेकांचे लक्ष असते आणि असे सावज हेरतात. आरोग्य विभागाच्या पेपर फुटी तशाच प्रकारचे मोडस ऑपरेंडी वापरण्यात आली आहे या प्रकरणात स्वतः अधिकारी गुंतले आहेत. २०१९ मध्ये आरोग्य खात्यातील आरोग्य सेवक या पदासाठी उमेदवारांनी अर्ज भरले होते. सदर परीक्षा फेब्रुवारी २०२१ मध्ये घेण्यात आली. या परीक्षेत पेपर फुटले. जळगाव, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यांचा आरोग्य सेवक पदाचा निकाल प्रलंबित ठेवण्यात आला. पुन्हा आरोग्य खात्यातील गट ‘क’ आणि गट ‘ड’ पदासाठी परीक्षा घेण्यात आली. मात्र सदर परीक्षा ब्लॅक लिस्टेड असणार्‍या न्यासा कंपनीकडून घेण्यात आली, यामध्ये प्रचंड चुका झाल्या त्यामुळे या परीक्षाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या. मात्र पुन्हा न्यासा कंपनीकडूनच सदर परीक्षा घेतल्यामुळे गट ‘क’ आणि गट ‘ड’ चे पेपर फुटले. पुन्हा म्हाडा च्या परीक्षेचा पेपर फुटल्याने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अचानक परीक्षा रद्द केल्याचं जाहीर केलं. मात्र ती परीक्षा टीसीएस या ब्लॅक लिस्टेड कंपनीला देण्यात आल्याचं सांगितलं.दरम्यान एमआयडीसी च्या विविध पदांचा निकाल जाहीर झाला त्या निकालात पूर्वी अगदी नगण्य गुण मिळवलेले विद्यार्थी रँक मध्ये आले आहेत. त्यामुळे त्या परीक्षेतही घोटाळा झाल्याचं नाकारता येत नाही.विद्यार्थ्यांनी वारंवार मागणी करूनही राज्य शासन या परीक्षा एम.पी.एस.सी मार्फत घेत नाहीये. एका बाजूला कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा आणि त्यात अशा प्रकारच्या घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता बदलत चाललीये, याला सर्वस्वी जबाबदार राज्य शासन आहे. पेपर फूटी प्रकरणात स्वतः पेपर घेणारेच सामील आहेत. त्यावर मंत्री मंडळातील कोणीच काही बोलत नाही. भाजप सरकारच्या काळात महापरीक्षा पोर्टल विद्यार्थ्यांनी मोर्चे आंदोलने करून बंद करण्याची मागणी केली. महाविकास आघाडी सरकारने हे पोर्टल बंद केले मात्र, आता पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ असाच प्रकार सुरु आहे. त्यामुळे दोन्ही सरकारची या घोटाळ्यामध्ये मिलीभगत आहे. आरोप-प्रत्यारोप करून केवळ तरुणांच्या आणि विद्यार्थ्यांच्या जीवावर सत्ताधारी आणि विरोधक राजकारण करू पाहत आहेत. आरोग्य भरती, म्हाडा या परीक्षेत पेपर फुटीचे प्रकरण घडले तसाच प्रकार पोलीस भरती आणि टीईटी परीक्षा मध्ये देखील झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व रॅकेटच्या विरोधात ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन आणि ऑल इंडिया यूथ फेडरेशन महाराष्ट्र राज्य कौन्सिलच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात येत आहे.मागण्या:१) राज्यातील सर्व नोकर भरतीच्या परीक्षा चतुर्थश्रेणी वगळता एम.पी.एस.सी मार्फत पारदर्शकपणे घेण्यात याव्यात.२) जवळपास ३ लाख पदे महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत व २४ लाख केंद्र सरकारच्या अखत्यारीत रिक्त आहेत. त्यात त्वरित भरण्यात याव्यात.३) केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्राचे झपाट्याने खाजगीकरण आपल्या भांडवलदार मित्रांच्या मदतीने करत आहे. त्यामुळे सरकारी नोकऱ्या व राखीव जागा या नष्ट होणार आहेत. हे खाजगीकरण त्वरित थांबवावे.४) सरकारी पदांचे कंत्राटीकरण थांबवावे.५) भगतसिंह नॅशनल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट (BNEGA) संसदेत पारीत करावा.६) राज्यात व केंद्रात होणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी घेतली जाणारे शुल्क हे जास्तीत जास्त शंभर रुपये घेण्याचा कायदा संसदेत व विधानसभेत पास करावा.७) राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक तसेच प्राध्यापकांच्या रिक्त जागा त्वरित भरून नियुक्तीमध्ये होणारा भ्रष्टाचार थांबवावा.८) तामिळनाडू सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात तसेच देशभरात बेरोजगारांना ‘बेरोजगार भत्ता’ मिळावा.९) NTA (National testing Agency) मार्फत केंद्रीय विद्यापीठांमध्ये (उदाहरणार्थ JNU) जाणीवपूर्वक वंचित व मागास जातीतील विद्यार्थ्यांच्या वर प्रवेश परीक्षेमध्ये धावण्याचे प्रकार घडत आहेत ते त्वरित थांबवावेत.१०) TET परीक्षेच्या घोटाळ्याची चौकशी करावी..११) स्पर्धा परीक्षेसाठी दुसऱ्या जिल्ह्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवास खर्चाची तसेच त्यांच्या निवाऱ्याची सोय करावी.वरील मागण्यांची पूर्तता न केल्यास ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन तसेच ऑल इंडिया युथ फेडरेशन मार्फत राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.मागणी पत्र येथील अहमदनगर निवासी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी ऑल इंडिया युथ फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष फिरोज शेख, रामदास वागस्कर, राजू नन्नवरे, कार्तिक पासलकर, अरुण थिटे, इमरान थोबनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here