
पुणे : राज्यातील शाळांसंदर्भातील विविधप्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (५ डिसेंबर) ‘शाळा बंद’ची हाक विविध संघटनांनीं दिली आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसह अनुदानित, विनाअनुदानित अशा सर्व प्रकारच्या शाळा बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, विद्यार्थी हित लक्षात घेऊन कोणतीही शाळा बंद राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या, तसेच बंद राहणाऱ्या शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा आदेश शिक्षण संचालकांनी दिला आहे.
शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भातील (टीईटी) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करावी. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, शिक्षणसेवक योजना रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरतीप्रक्रिया तत्काळ सुरू करावी, अशा विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विविध संघटनांनी शुक्रवारी ‘शाळा बंद’ आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात शिक्षक, शिक्षकतेर संघटना, संस्थाचालक संघटनांचा सहभाग आहे. मात्र, काही संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिलेला नाही.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस म्हणाले, ‘अनुदानित, विनाअनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा बंद राहतील. शासनाची धोरणे शिक्षण क्षेत्रासाठी नुकसानकारक आहेत. संचमान्यतेच्या नियमावलीनै गावखेड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षक मिळणार नाही. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. शासनाच्या धोरणाचा फटका प्रामुख्याने मराठी माध्यमाच्या शाळांना बसत आहे. खर्च परवडत नसल्याचे कारण शासनाकडून दिले जाते. मात्र, या धोरणांना आता विरोध न केल्यास मराठी शाळा, शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे शाळा बंद आंदोलन करूनही तोडगा न निघाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल.’
दरम्यान, शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी राज्यातील शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना परिपत्रकाद्वारे निर्देश दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित शाळातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विविध मागण्यांसाठी ५ डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलनात सहभागी होणार असल्याचे वृत्तपत्रांतील बातम्यांतून निदर्शनास आले आहे. ‘विद्यार्थी हित लक्षात घेता कोणतीही शाळा ५ डिसेंबर रोजी बंद राहणार नाही याची दक्षता घ्यावी, ज्या शाळा बंद राहतील, त्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याची कार्यवाही करून ती बाब शाळांच्या निदर्शनास आणून द्यावी,’ असे स्पष्ट करण्यात आले आहे.



