राज्याच्या मा. मुख्यमंत्र्यांबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. यापूर्वी राजकारणात अशी भाषा कधी वापरली गेली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात कसे सहकारी निवडले आहेत याची छोटीशी चुणूक नारायण राणे यांच्या वक्तव्यावरुन देशाला आणि महाराष्ट्राला मिळालेली आहे, अशा शब्दांत जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
पत्रकारांच्या प्रश्नावर राजकारणाचा स्तर खाली गेलेला नसून काही लोकांचा स्तर खाली गेला आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. इतक्या खालच्या थराला जाऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल असे वक्तव्य करणे याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. मुख्यमंत्र्यांबाबत अशा प्रकारचे विधान करणे हेच मुळात गंभीर आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजप त्याचे समर्थन करतात का याचा खुलासा होणे आवश्यक आहे, अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपाचा वैयक्तिक राग असेल, तरी त्यांच्याबद्दल अशा प्रकारची भाषा वापरणे महाराष्ट्र कधीच मान्य करणार नाही. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून उद्धव ठाकरे अतिशय संयमाने आणि जबाबदारीने वागत आहेत. पण अतिशय टोकाची भूमिका जर कोण घेत असेल, त्याचे पडसाद जनतेमध्ये उमटत असतील, तर योग्य काळजी गृह खाते घेईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले. कोणताही परिस्थितीत कायदा कोणी हातात घ्यावा याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष समर्थन करणार नाही, असे जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
Jayant Patil – जयंत पाटील Uddhav Thackeray Narayan Rane CMOMaharashtra