राजधानी नवीदिल्ली पुन्हा एकदा बलात्काराने हादरली!
नवीदिल्ली : राजधानी नवीदिल्लीतल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये २७ वर्षीय महिला टुरिस्ट गाईडवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कर्ज देण्याच्या बहाण्याने आरोपींनी तिला रात्री हॉटेलमध्ये बोलावले आणि त्या हॉटेलच्या एका खोलीत आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेने देशाची राजधानी नवीदिल्ली पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेने हादरली आहे.
कर्जाचे प्रलोभन दाखवून हॉटेलला बोलावले होते, असा आरोप महिलेने केला आहे. स्वस्त दराने कर्ज देणार असल्याचे आरोपींनी सांगितले होते. तिला रात्री साडेनऊच्या सुमारास हॉटेलच्या जवळ बोलावले होते. त्यानंतर पैसे देण्याच्या बहाण्याने तिला हॉटेलच्या खोलीत नेले.
तिथे रात्री एक वाजेपर्यंत बलात्कार केला. प्रतिकार केला असता, जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद सदर महिलेने दिली आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी रात्री आरोपींनी कर्ज देण्यासाठी बोलावले.
त्यांच्याकडून कर्जाचा दुसरा हप्ता घ्यायचा होता. पोलिसांनी सांगितले की, पीडित महिला ही टुरिस्ट गाईड आणि तिकीट बुकिंग एजंट आहे. तर हे कृत्य करणारा मनोज शर्मा हा मालवीयनगरचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.






