राकेश रोशन यांच्यावर हल्ला करणारा अटकेत; पॅरोलवर असताना झाला होता फरार

बॉलिवूड दिग्दर्शक राकेश रोशन यांच्यावर २००० साली हल्ला करणाऱ्या गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. सुनील गायकवाड असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तीन महिन्यांपूर्वी तो पॅरोलवरुन फरार झाला होता. शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास कळवा येथून त्याला अटक करण्यात आल्याचं ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

सुनील गायकवाड हा कुख्यात गुंड आणि शार्पशूटर आहे. त्याच्याविरुद्ध ११ खुनाची प्रकरणे,७ खुनाचा प्रयत्न करण्याचे गुन्हे दाखल आहेत. यापैकी त्याने राकेश रोशन यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला होता. २००० साली जानेवारीमध्ये राकेश रोशन यांच्या सांताक्रुझ येथील ऑफिसच्या बाहेर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या गोळ्या सुनील गायकवाडने झाडल्या होत्या. या प्रकरणानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती.

एका खून प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून त्याची रवानगी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. २६ जून रोजी तो २८ दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला होता.मात्र, पॅरोल संपल्यानंतरही तो परत तुरुंगात येण्याऐवजी फरार झाला. यानंतर शुक्रवारी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, सुनील गायकवाड हा अली बुदेश आणि सुभाषसिंग ठाकूर यांच्या टोळीतील सदस्य असून १९९९-२००० या वर्षात झालेल्या अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here