रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine Crisis) युद्ध सुरूच आहे. या युद्धाचा मोठा प्रभाव हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर होताना दिसून येत आहे. युद्धामुळे खाद्य तेलापासून ते कच्च्या तेलापर्यंत सर्वच वस्तुंचे दर वाढले आहेत. दरम्यान या युद्धाचा फटका हा भारतीय अर्थव्यवस्थेला देखील बसू शकतो असा अंदाज इंडिया रेटिंग्सने (India Ratings) व्यक्त केला आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम हा भारताच्या आर्थिक वृद्धी दरावर होऊ शकतो, तसे झाल्यास पुढील वर्षी आर्थिक वृद्धी (Growth) दरात घट होऊन तो 7.2 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो असे इंडिया रेटिंग्सने म्हटले आहे. दरम्यान त्यापूर्वी पुढील वर्षी भारताचा आर्थिक वृद्धी दर 7.6 टक्के राहण्याचा अंदाज देखील संस्थेच्या वतीने वर्तवण्यात आला होता. इंडिया रेटिंग्सनुसार रशिया आणि युक्रेन युद्धामुळे अनिश्चितता वाढेल. ज्याचा परिणाम हा ग्राहकांवर होणार असून, त्यामुळे वस्तुंची मागणी कमी होऊ शकते. त्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसेल.
इंडिया रेटिंग्सननुसार रशिया आणि युक्रेन युद्धामुळे गेल्या काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तीन आठवड्यापूर्वी कच्चे तेल गेल्या चौदा वर्षातील सर्वोच्च किमतीवर पोहोचले होते. सध्या त्यामध्ये काहीसी घसरण दिसत असली तरी देखील सध्या कच्च्या तेलाच्या किमती वाढलेल्याच आहेत. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर भरमसाठ वाढताना दिसत आहेत. इंधन दरवाढीमुळे पुढील काळात महागाई देखील वाढण्याची शक्यता इंडिया रेटिंग्सने व्यक्त केली आहे.
इंडिया रेटिंग्सने पुढे आपल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, महागाई वाढल्यामुळे ग्राहकांच्या हातात पैसा किंती उरेल यात शंका आहे. पैशांभावी वस्तूंच्या मागणीमध्ये देखील घट होऊ शकते. वस्तुंच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात जवळपास तेरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र त्या तुलनेत मागणीत घट होईल या भीतीपोटी अद्यापही कंपन्यांनी आपल्या वस्तूंच्या दरात म्हणावी तशी वाढ केलेली नाही. कंपन्यांनी आपल्या उत्पादनाचे दर केवळ सहा टक्क्यांनीच वाढवले आहेत. मात्र येणाऱ्या काळात जर कंपन्यांनी आपल्या उत्पादनाचे रेट वाढवले तर वस्तूंच्या मागणीमध्ये घट होऊ शकते. त्याचा थेट फटका हा आर्थिक वृद्धी दराला बसण्याची शक्यता आहे.