वाशिम, दि. १२ (जिमाका) : जिल्ह्यात ७ मे २०२१ रोजीच्या आदेशानुसार कडक निर्बंध लागू करण्यात आले असून या काळात कोणतेही धार्मिक उत्सव, राजकीय, सामाजिक, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व इतर कार्यक्रम व मेळावे करण्यास पूर्णपणे बंदी आहे. त्यामुळे रमजान ईद (ईद उल फित्र) हा सण वैयक्तिक स्वरुपात घरगुती पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या सणानिमित्त रॅली, पथसंचालन, मिरवणूक तसेच गर्दी होणारी कोणतीही कृती करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, १२ मे रोजी आदेश निर्गमित केले आहेत.
या आदेशात म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान ईद करीता मुस्लीम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच ईप्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करून ‘ब्रेक द चेन’ आदेशाचे काटेकोर पालन करावे. नमाज पठणाकरीता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये. जिल्ह्यात कडक निर्बंध लागू असल्याने दुकाने, बाजारपेठा बंद आहेत. कडक निर्बंधातून मुभा दिलेल्या केवळ अत्यावश्यक सेवांच्या दुकानातून घरपोच सुविधेद्वारे खरेदी करता येईल.
कोविड-१९ या विषाणूच्या वाढत्या संसर्गास प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने राज्यात फौ. दं. सं. कलम १४४, संचारबंदी लागू आहे. त्यामुळे संचारबंदी कालावधीत फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नये. तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये. रमजान ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतीक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये.
धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लीम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरा करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी. रमजान ईदच्या दिवशी सोशल डिस्टंन्सिगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.
कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष रमजान ईदच्या मधल्या काळात अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे, असे राज्य आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध मा. मुख्य सचिव, महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महाराष्ट्र शासन यांचेकडील आदेश क्रमांक डीएमयु/२०२०/डीआयएसएम-१ दिनांक २९ जुलै २०२० मधील परिशिष्ट ३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० व भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ नुसार तसेच साथरोग अधिनियम १८९७ अन्वये दंडनीय तथा कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.