या’ संभाव्य निवडणुकीत पुन्हा एकदा घुमणार पक्षविरहित निवडणुकीचा नारा!
इच्छुकांच्या गुप्तबैठका वाढल्या!
मोर्चेबांधणीला झाला जोरदार प्रारंभ!
अहमदनगर कँन्टोन्मेंट बोर्डाच्या लोकनियुक्त सदस्यांची मुदत संपत आलीय. त्यामुळे कॅंटोन्मेंट बोर्डात एकसदस्यीय नियुक्ती होते, की निवडणुकीची प्रक्रिया सुरु होते, याकडे भिंगारवासियांचं लक्ष लागलंय.
मात्र संभाव्य निवडणुकीचीच शक्यता डोळ्यासमोर ठेवून भिंगारमध्ये पक्षविरहित पॅनलची मोर्चेबांधणी करण्यासाठी गुप्त बैठका सुरु असल्याची माहिती हाती आली आहे.
अहमदनगर कॅंटोन्मेंट बोर्डात सध्या शिवसेनेचा उपाध्यक्ष आहे. सात लोकनियुक्त सदस्य, लष्कराचे आठ सदस्य, जिल्हा प्रशासनाचा एक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशा सतरा व्यक्ती कॅंटोन्मेंट बोर्डाचा गाडा हाकत आहेत.
कँटोन्मेंट बोर्डाचे अध्यक्षपद लष्कराच्या ब्रिगेडियकडे असते. खरं तर लष्कराच्या जवान आणि अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी कॅंटोन्मेंट बोर्डाची सन १९१६ साली स्थापना करण्यात आली. त्यापूर्वी भिंगारला लोकल बोर्ड होते. हा झाला अहमदनगर कॅंटोन्मेंट बोर्डाचा थोडक्यात इतिहास.
केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या या कॅंटोन्मेंट बोर्डाच्या लोकनियुक्त सदस्यांची मुदत संपत आल्याने निवडणुकीची घोषणा होते, की एक सदस्यीय पद्धतीने कोणत्याही एका व्यक्तीची नियुक्ती होते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
परंतु एकसदस्यीय नियुक्ती आणि निवडणूक या दोन्हीही पर्यायासाठी इच्छुकांची लगबग आणि मोर्चेबांधणी चांगलीच वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर अहमदनगर कॅंटोन्मेंट बोर्डाची संभाव्य निवडणूक पक्षविरहित व्हावी, व्यक्तिगत पातळीवर सामाजिक काम पाहून ही निवडणूक व्हावी, यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
दरम्यान, ही निवडणूक पक्षीय पातळीवर झाल्यास उमेदवाराच्या मतांवर मोठा विपरित परिणाम होतो. त्यामुळे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या संभाव्य निवडणुकीत पुन्हा एकदा पक्षविरहित निवडणुकीचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो.
यापूर्वी पार पडलेल्या निवडणुकीतदेखील हा मुद्दा उपस्थित झाला होता. मात्र काही पक्षांच्या नेत्यांनी कॅंटोन्मेंट बोर्डाची निवडणूक राजकीय पक्ष चिन्हावर व्हावी, अशी आग्रही मागणी केल्याने यापूर्वीची निवडणूक राजकीय पक्ष चिन्हावर लढविली गेली.
असा होतो मतांवर परिणाम!
भिंगारमध्ये एकूण सात प्रभाग आहेत. त्यापैकी एक मागास प्रवर्ग, एक महिला राखीव आणि उर्वरित चार प्रभागांमध्ये जनरल जागांवर निवडणूक होते.
एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याने भरीव स्वरूपाचे काम केले, लोकांच्या प्रश्नांची चांगल्या प्रकारे सोडवणूक केली तर त्या सामाजिक कार्यकर्त्याला स्थानिक जनतेची मोठी साथ मिळते.
मात्र पक्षीय निवडणुकीत ही मते विभागली जातात. भिंगार मध्ये सर्वच जाती धर्मातील लोकं आनंदाने गुण्यागोविंदाने राहतात, एकमेकाच्या सुखदुःखात मदत करण्याची भावना ठेऊन सर्व जण राहतात. परंतु निवडणुकीत पक्षाकडून धर्माचे समीकरण मांडून मतांची विभागणी होत असते, एका अर्थाने इच्छुक उमेदवाराच्या मतांवर पक्षीय निवडणुकीमुळे मोठा परिणाम होत असल्याने हा ‘राजकीय तोटा’ टाळण्यासाठी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या यावेळच्या संभाव्य निवडणुकीत पक्षविरहित निवडणुकीचा मुद्दा चर्चेचा विषय ठरणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्हा प्रशासनाचा सदस्य कुठाय?
अहमदनगर कॅंटोन्मेंट बोर्डावर जिल्हाप्रशासनाच्या एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते. सध्या लष्कराचा अध्यक्ष आणि शिवसेनेचा उपाध्यक्ष आहे.
मात्र जिल्हा प्रशासनाच्या कोणत्या अधिकाऱ्याची कॅंटोन्मेंट बोडाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे, याविषयी भिंगारच्या जनतेमध्ये संभ्रम आहे. जिल्हाधिकारी कार्यातल्या उपजिल्हाधिकारी पदाच्या अधिकाऱ्याची कॅंटोन्मेंट बोर्डाच्या सदस्यपदी नियुक्ती केली जाते.
मात्र याविषयी कोणाला काहीही कल्पना नाही. कॅंटोन्मेंट बोर्डाच्या मासिक बैठकीला जिल्हाप्रशासनाचा कोणता अधिकारी जातो, याविषयी मोठी संभ्रमावस्था आहे.
भिंगारमध्ये अजूनही ब्रिटिश कार्यप्रणाली!
देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षांहून अधिक काळ लोटला. मात्र कॅंटोन्मेंट बोर्डाच्या माध्यमातून भिंगारमध्ये ब्रिटिशांचेच कायदे आहेत.
फक्त म्हणायला कॅंटोन्मेंट बोर्डाला नगरपालिकेचा दर्जा मिळाला. मात्र राज्य सरकारचे कोणते कायदे येथे लागू आहेत. राज्य सरकारच्या कोणत्या योजना येथे राबविली जातात,
भिंगारला सर्वात जास्त दलित बांधव राहत असूनही राज्य सरकारने दलित वस्ती विकास योजनेचा किती निधी कॅंटोन्मेंट बोर्डाला दिला, हा निधी आणण्यासाठी कोणी किती प्रयत्न केले, केले असतील तर निधी का मिळाला नाही आणि
हा निधी मिळाला असल्यास त्याचा काय आणि कसा सदुपयोग करण्यात आला, याविषयीदेखील भिंगारमध्ये कमालीचा गोंधळ आहे.
संभाव्य उमदेवारांचं काय आहे ‘व्हिजन’?
अहमदनगर कॅंटोन्मेंट बोर्डाची यावेळची संभाव्य निवडणूक लढायची आणि ती जिंकायची, असा निर्धार अनेकांनी केलाय.
त्यासाठी गुप्तबैठका, मोर्चेबांधणी सुरु केलीय. मतदारांच्या वैयक्तिक गाठी भेटी घेतल्या जात आहेत. यावेळी ‘लक्ष ठेवा’च अशी विनवणीही मतदारांना केली जात आहे.
मात्र अहमदनगर कॅंटोन्मेंट बोर्डाची ही संभाव्य निवडणूक का लढवायची, सत्तेच्या माध्यमातून भिंगारच्या जनतेला नक्की काय द्यायचंय, भिंगारवासियांच्या समस्या काय आहेत,
त्या सोडविण्यासाठी नक्की कुठे आणि कसा पाठपुरावा करायचा, याचं या इच्छुक आणि संभाव्य उमेदवारांकडे नक्की काय ‘व्हिजन’ आहे, हे समजायला मात्र अद्याप तरी कोणताच मार्ग नाही.






