‘या’ तीन राज्यांना धोका, अलर्ट जारी जवाद चक्रीवादळाबाबत मोठी बातमी.

691

सध्या हिवाळा सुरू असला तरी राज्यात सर्वदूर सध्या अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे हवेत गारठा निर्माण झालाय. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाचं देखील नुकसान झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता पुर्वकिनारपट्टीवर चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे.

बंगालच्या उपसागरात जवाद नावाचं चक्रीवादळ निर्माण झालं होतं. आज हे चक्रीवादळ विशाखापट्टनम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हे वादळ शनिवारी सकाळी आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकेल, असं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे.

त्यामुळे आंध्र आणि ओडिसाच्या किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर ताशी 50 ते 55 किमी ते 100 किमीपर्यंत वारं वाहिलं, अशी माहिती देखील हवामान खात्याने दिली आहे.

दरम्यान संपूर्ण पूर्व किनारपट्टीवर बचावकार्यासाठी सज्जता ठेवण्यात आली आहे. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेत आंध्र प्रदेश आणि ओडिशात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून किमान 24 गाड्या रेल्वेने रद्द केल्या आहेत.

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

परिणामी महाराष्ट्रातल्या मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागात जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता हवामान विभागाचे वैज्ञानिक के. एस. होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे.

जवाद चक्रीवादळ आणि अरबी समुद्रात उत्तर भागात तयार झालेला कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, मुंबई, पुणे, जळगाव, नागपूर, अमरावती, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर या भागात जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केलीय.

राज्यात रविवारपर्यंत पावसाळी स्थिती कायम राहणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारपासून पावसाळी वातावरण दूर होण्याची शक्यता आहे. मात्र, सकाळी आणि रात्री धुकं पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here