मोठी बातमी ! शैक्षणिक सहलींसाठी विद्यार्थ्यांसाठी सहलीत ५० टक्के सवलत; प्रत्येकास १० लाखांचा अपघात विमाही; एसटी महामंडळाचे आगारप्रमुख जाणार शाळांमध्ये

    20

    सोलापूर : नोव्हेंबरअखेर, डिसेंबरमध्ये शहर-जिल्ह्यातील बहुतेक शाळांच्या शैक्षणिक सहली निघतात. यंदा सर्वच शाळांना जुनाट नव्हे तर नवीन बसगाड्या सहलीसाठी दिल्या जाणार आहेत.

    दरम्यान, गतवर्षी ज्या शाळांनी शैक्षणिक सहली काढल्या होत्या, त्या शाळांमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आगारप्रमुख, विभागप्रमुख भेटी देणार आहेत.दरवर्षी शैक्षणिक सहलींतून परिवहन महामंडळाला सुमारे १०० कोटी रुपये मिळतात. सोलापूर जिल्ह्यातूनही १०० हून अधिक शाळांच्या शैक्षणिक सहली निघतात.राज्यातील गड-किल्ले, ऐतिहासिक ठिकाणे, पर्यटन स्थळांना भेटी दिल्या जातात. शैक्षणिक सहलीसाठी तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जाते. पण, परराज्यातील सहलीसाठी शासनाकडून सवलत मिळत नाही. ५० टक्क्यांची सवलत ही महाराष्ट्रापुरतीच आहे. सहलीसाठी एसटी बस बुकिंग करण्यासाठी सुरवातीलाच संपूर्ण रक्कम शाळेला भरावी लागते. दरम्यान, गतवर्षी शैक्षणिक सहलीवेळी अनेक शाळांची जुन्या बसगाड्यांमुळे खूपच पंचाईत झाली. दोन-चार दिवसांची सहल एक-दोन दिवसांनी लांबली. तसेच गाड्या बंद पडल्याने काही तास वाटेतच थांबून पर्यायी गाड्यांमधून त्यांना पुढे मार्गस्थ व्हावे लागले.

    या पार्श्वभूमीवर आता शैक्षणिक सहलीसाठी शाळांना नव्या बसगाड्या दिल्या जाणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तशा सूचना सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत. आता कोणती शाळा कोणत्या ठिकाणी, जिल्ह्यात सहलीसाठी जाणार आहे, याची माहिती घेण्यासाठी प्रत्येक आगाराचे प्रमुख व विभागाचे प्रमुख त्यांच्या त्यांच्या हद्दीतील शाळा- महाविद्यालयांना भेटी देणार आहेत.त्यातून किती बसगाड्या सहलीसाठी लागणार आहेत, याचा अंदाज येणार आहे.

    विद्यार्थ्यांना १० लाखांचा अपघात विमा

    एसटी बसमधील प्रवास सुरक्षित असतो. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी बस’ या ब्रीदवाक्यानुसार लालपरी २४ तास प्रवाशांची सेवा बजावते. अनुभवी चालक, आरामदायी बैठक व्यवस्था, सुरक्षित प्रवासाची हमी, ही लालपरीची वैशिष्ट्ये आहेत. पण, अचानक कधी अपघात झाला तर शैक्षणिक सहलीत सहभागी विद्यार्थ्यांसाठी दहा लाखांचा विमा दिला जातो.

    शाळांमध्ये जातील आगारप्रमुख, विभागप्रमुख

    शाळा-महाविद्यालयांच्या शैक्षणिक सहली नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच काढल्या जातात. त्याअनुषंगाने शाळांमध्ये आता आमचे विभागप्रमुख जातील. शाळांना शैक्षणिक सहलीसाठी नव्या बसगाड्या दिल्या जाणार आहेत. शाळांनी गाड्या लवकर बुकिंग कराव्यात.

    अमोल गोंजारी, विभागप्रमुख, महाराष्ट्र राज्य परिवहनमहामंडळ, सोलापूर

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here