
अमेरिकेनं भारतावर टॅरीफ लावल्यानंतर अमेरिका आणि भारतामधील संबंधात कटुता निर्माण झाली आहे. दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणामुळे अनेक देश अमेरिकेवर नाराज असताना दुसरीकडे आता चीन, भारत आणि रशिया अधिक जवळ येताना दिसत आहेत.
यामुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे, व्हाईट हाऊसला देखील या धोक्याची जाणीव झाली आहे.
दरम्यान टॅरिफ वार सुरू असतानाच आता भारतानं मोठा निर्णय घेतला आहे. भारताची सर्वात मोठी सरकारी पेट्रोलियम कंपनी असलेल्या इंडियन ऑइलने (IOC) अमेरिकेकडून कच्च्या तेलाची खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे.अमेरिकेऐवजी, इंडियन ऑईलनं नुकतंच नायजेरिया आणि आखाती देशांकडून तब्बल तीस लाख बॅरल कच्च्या तेलाची खरेदी केली आहे. हा अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेमध्ये असलेले कच्च्या तेलाचे उच्च दर आणि उपलब्ध असलेले विविध पर्याय यामुळे आता इंडियन ऑइलने अमेरिकेकडून कच्च्या तेलाची खरेदी न करता नायजेरिया आणि आखाती देशांसोबत मोठी डील केली आहे.
कोणाकडून किती तेलाची खरेदीसमोर आलेल्या माहितीनुसार आयओसीने नायजेरीयाकडून तब्बल वीस लाख बॅरल तेलाची खरेदी केली आहे. तर या व्यतिरिक्त अबू धाबीमधून दहा लाख बॅरल कच्च्या तेलाची खरेदी करण्यात आली आहे. नायजेरीयाकडून खरेदी करण्यात आलेलं कच्च तेल सप्टेंबर, ऑक्टोबर एंडिंगपर्यंत भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात इंडियन ऑइलने अमेरिकेकडून 50 लाख बॅरल तेल खरेदी केलं होतं, मात्र त्यानंतर आता या कंपनीने अमेरिकेतून तेल खेरदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे भारताला इतर देशातून कच्च्या तेलाची खरेदी केल्यास मोठी सूट मिळत आहे, दुसरीकडे अमेरिकेच्या तुलनेत वाहतूक खर्च देखील कमी असल्यानं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून अमेरिकेकडून भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे. त्यानंतर भारतानं हा मोठा निर्णय घेतला आहे.