
खामगाव विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता मजबूत सुरुवात मिळाल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी आज अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. या प्रवेश सोहळ्यात त्यांच्यासोबत सुमारे ११ हजार कार्यकर्ते देखील दाखल झाले आहेत. या पक्षप्रवेशामुळे अजित पवार गटाला १० हत्तींचं बळ मिळाली असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
माजी आमदार दिलीपकुमार सानंदा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. गेल्या ४० वर्षापासून त्यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवली. मात्र, आता त्यांनी काँग्रेसची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आज खामगावमध्ये अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची धुरा बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सोपवल्यानंतर, बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसमधील मोठे नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर खामगावमधील काँग्रेसचा एक बडा चेहरा असलेले सानंदा यांचे पक्षांतर काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
सानंदा यांचा पक्षप्रवेश एक भव्य सोहळ्याच्या माध्यमातून पार पडला. या दिमाखदार सोहळ्यात हजारो नागरिकांची उपस्थिती होती. भर पावसातही कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहून अजित पवार स्वतःही भारावून गेले. यावेळी भाषणादरम्यान, त्यांनी जनतेला आश्वासन दिलं.
“सानंदा यांना राष्ट्रवादीत कधीही पश्चाताप होणार नाही, त्यांच्या मागे संपूर्ण पक्ष ताकदीने उभा असेल,” असं ठामपणे अजित पवारांनी आपल्या भाषणातून सांगितलं.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्ष ताकदीनिशी सानंदांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं. दरम्यान, घाटाखालील भागात कमकुवत असलेल्या राष्ट्रवादीला माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या माध्यमाने बळ मिळाले असल्याचं बोललं जात आहे.